पडद्याआडून – नाटकाच्या तिकिटाची ‘रांग’ कुठे हरवली?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> पराग खोत

मराठी नाटक सध्या चांगल्या अर्थाने ‘हाऊसफुल्ल’ आहे. उत्तमोत्तम नाटके रंगभूमीवर येत आहेत. सांगीतिक कार्यक्रमांना गर्दी होत आहे आणि प्रेक्षकही त्यांना भरभरून प्रतिसाद देत आहेत. नाटकाची तिकिटे प्रयोगाच्या दिवशी नव्हे, तर कित्येक दिवस आधीच आरक्षित होत आहेत. म्हणजे रंगभूमीला पुन्हा एकदा प्रेक्षकांची पसंती मिळते आहे ही आनंदाची बाब.

या बदलामागे डिजिटल तिकीटव्यवस्थेचा मोठा वाटा आहे. घरबसल्या नाटक शोधायचे, तारीख आणि नाट्यगृह निवडायचे, उपलब्ध जागा पाहायच्या आणि मोबाईलवर तिकीट काढायचे हे आता सहज शक्य झाले आहे. ‘बुक माय शो’च्या मुंबईतील मराठी नाटकांच्या यादीत सध्या विविध नाट्यगृहे, प्रयोग, तिकीटदर आणि उपलब्धता एका ठिकाणी पाहता येते. ‘तिकीटालय’नेही थोड्याच कालावधीत मराठी नाटक, संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी एक स्वतंत्र आणि सक्षम डिजिटल प्लॅटफॉर्म उभा केलाय. या दोघांच्या जोडीला ‘तिकीट खिडकी’ आणि इतरही काही ॲप्स आहेत.

निर्मात्यांसाठी तर ही व्यवस्था वरदानच म्हणावी लागेल. किती तिकिटे विकली गेली, किती शिल्लक आहेत, प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा आहे याचा अंदाज आधीच येऊ शकतो. प्रयोगाच्या दिवशी रिकाम्या खुर्च्यांपेक्षा भरलेले सभागृह पाहणे कोणत्याही निर्मात्याला सुखावणारेच. प्रेक्षकांनाही आपल्या सोयीच्या जागेचे तिकीट घरबसल्या मिळते. नाट्यगृहावर जाणे, रांगेत उभे राहणे, तिकीट मिळेल की नाही याची धाकधूक या सगळ्यापासून त्यांची सुटका होते.

पण या डिजिटल सुखसोयीची दुसरी बाजूही आहे…

एकेकाळी नाटकाची आगाऊ तिकिटे काढण्यासाठी नाट्यगृहावर जाणे हा नाटकवेड्या रसिकांच्या आयुष्याचा एक भाग होता. काउंटर उघडण्यापूर्वीच रांग लागायची. पुढच्या रांगेतील दोन-तीन जागा मिळाल्या की जणू काही लढाई जिंकल्याचा आनंद व्हायचा. नाटकाच्या जाहिरातीपेक्षा नाटकाची तिकिटे हातात असणे हीच त्या रसिकासाठी मोठी बातमी असायची. मात्र आज तोच रसिक काहीसा हिरमुसला आहे.

नाटकाच्या एकूण तिकिटांपैकी मोठा हिस्सा ऑनलाइन व्यासपीठांवर उपलब्ध होत असल्याने नाट्यगृहाच्या काउंटरवर येणाऱ्या पारंपरिक प्रेक्षकांसाठी जागा कमी उपलब्ध होतात, अशी त्यांची तक्रार आहे. विशेषतः पुढच्या रांगेत बसून नाटक पाहण्याची सवय असलेल्या अस्सल नाटकवेड्याला कधी कधी ऑनलाइन व्यवस्थेमुळे हवे ते तिकीट मिळत नाही. त्याला नाटक पाहायचे असते; पण त्यासाठी ‘योग्य जागा’ही तितकीच महत्त्वाची असते.

त्यात ऑनलाइन तिकिटावर आकारला जाणारा ‘कन्व्हिनियन्स फी’ किंवा इंटरनेट हँडलिंग शुल्काचा मुद्दा आहेच. बुक माय शो स्वतः या शुल्काचे समर्थन करताना ऑनलाइन बुकिंगची सुविधा, घरबसल्या आगाऊ आरक्षण, जागेची निवड आणि रांगेत उभे राहण्यापासून होणारी बचत यांचा उल्लेख करते. ग्राहकाच्या दृष्टीने मात्र गणित साधे आहे. नाटकाचे तिकीट ५०० रुपये असेल तर त्यावर आणखी काही शुल्क कशासाठी? नाट्यगृहाच्या खिडकीवर त्याच तिकिटासाठी मूळ किंमतच द्यावी लागत असेल तर ऑनलाइनसाठी अतिरिक्त पैसे का?

हा प्रश्न रास्त आहे; पण ऑनलाइन व्यवस्थेची बाजूही तितकीच समर्थनीय आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म ही केवळ तिकिटांची खिडकी नाही. पेमेंटची सुविधा, तिकीट व्यवस्थापन, डिजिटल कन्फर्मेशन, आसन निवड, ग्राहकाला माहिती देणे अशा अनेक सेवा त्या व्यवस्थेत येतात. त्यामुळे अतिरिक्त शुल्क आकारले जाते, असे बुक माय शो स्पष्ट करते.

मग यावर उपाय काय? ऑनलाइन विरुद्ध ऑफलाइन असा संघर्ष उभा करण्यापेक्षा दोन्ही व्यवस्थांचा सुंदर मेळ घालणे हा अधिक योग्य मार्ग ठरू शकतो.

चित्रपटगृहांमध्ये जशी ऑनलाइन आणि प्रत्यक्ष काउंटरवरील तिकीटव्यवस्था एकाच वेळी चालते, तशीच रंगभूमीवरही पूर्णपणे एकात्मिक व्यवस्था निर्माण झाली तर? एखाद्या नाटकाच्या एकूण आसनक्षमतेतील काही जागा ऑनलाइन आणि काही जागा नाट्यगृहाच्या काउंटरवर उपलब्ध ठेवण्याऐवजी एकच ‘रिअल-टाइम’ तिकीटव्यवस्था असावी. काउंटरवरून तिकीट काढणाऱ्या प्रेक्षकाला आणि मोबाईलवरून तिकीट काढणाऱ्या प्रेक्षकाला त्याच क्षणी त्याच उपलब्ध जागा दिसाव्यात.

याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पारदर्शकता. ‘ऑनलाइनमध्ये जागा आहेत, पण काउंटरवर नाहीत’ किंवा ‘काउंटरवर जागा आहेत पण ऑनलाइन दिसत नाहीत’ अशी परिस्थिती राहणार नाही. प्रेक्षकाला आपल्याला हवा तो पर्याय निवडता येईल.

ऑनलाइन सुविधा हवी असेल तर तिचे शुल्क देऊन घरबसल्या तिकीट घ्या; नाट्यगृहावर जाणे पसंत असेल तर काउंटरवर जाऊन मूळ किमतीत तिकीट घ्या. दोन्ही मार्ग खुले असतील. अर्थात, त्यासाठी नाट्यगृहावरील बुकिंग क्लार्कना डिजिटल तिकीटव्यवस्था हाताळण्याचे प्रशिक्षण द्यावे लागेल. पण आजच्या काळात हे काही अशक्य काम नाही. उलट नाट्यगृहाच्या कर्मचाऱ्यांना अशी सुविधा शिकवणे ही रंगभूमीच्या आधुनिकीकरणातील आवश्यक पायरी ठरू शकते.

यातून आणखी एक महत्त्वाचा प्रश्न सुटेल— ‘तिकीट कोणासाठी?’

नाटक हे केवळ ऑनलाइन व्यवहार करणाऱ्या प्रेक्षकाचे नाही आणि केवळ नाट्यगृहाच्या खिडकीवर रांगेत उभे राहणाऱ्या रसिकाचेही नाही. दोघेही रंगभूमीचेच प्रेक्षक आहेत. ज्याला मोबाईलवरून तिकीट काढणे सोयीचे वाटते, त्याचे स्वागत झाले पाहिजे आणि ज्याला अजूनही नाट्यगृहाच्या खिडकीवर जाऊन तिकीट काढण्यातच आनंद मिळतो, त्याच्याही हातातील तिकीट हिरावून घेतले जाऊ नये. आज मराठी रंगभूमीला प्रेक्षक मिळत आहेत ही सर्वांत आनंदाची गोष्ट आहे. डिजिटल युगामुळे हा प्रेक्षक अधिक सहजपणे रंगभूमीकडे पोहोचत असेल तर त्याचे स्वागतच झाले पाहिजे; पण डिजिटल सोयीच्या नावाखाली पारंपरिक नाटकवेड्या रसिकाला दूर करणेही योग्य नाही.

शेवटी नाटक रंगमंचावर घडते; मोबाईलच्या पडद्यावर नाही. तिकीट ऑनलाइन काढलेले असो वा नाट्यगृहाच्या खिडकीवरून घेतलेले, दोन्ही प्रेक्षक एकाच सभागृहात बसून टाळ्या वाजवणार आहेत. त्यामुळे तिकीटव्यवस्थेनेही त्या दोघांमध्ये भेद न करता, ‘ज्याची जशी इच्छा, त्याला तसा मार्ग’ अशी भूमिका घेतली तर रंगभूमी अधिक समृद्ध होईल. रांग संपली तरी नाटकाची ओढ संपता कामा नये. उलट, त्या रांगेची जागा आता डिजिटल पडद्याने घेतली असेल तर त्या पडद्यामागेही जुन्या नाटकवेड्या रसिकासाठी एक जागा राखून ठेवायला हवी!