
नांदेडच्या श्रीनगर भागातील प्रतिभानिकेतन शाळेत काल सकाळी मुख्याध्यापकाने दहा वर्षीय अल्पवयीन मुलीस गैरकृत्य करुन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली असून, भाग्यनगर पोलिसांनी मुख्याध्यापकास ताब्यात घेतले आहे.
नांदेडच्या श्रीनगर भागात प्रतिभानिकेतन शाळा गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे. शाळेतील ५० वर्षीय मुख्याध्यापक रवी सोनवणे यांनी काल सकाळी दहा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत गैरकृत्य करुन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या मुलींनी आरडाओरड केल्यानंतर हा संतापजनक प्रकार उघडकीस आला. घटनेनंतर मुलीच्या पालकाने काल रात्री भाग्यनगर पोलीस ठाणे गाठून याबाबत लेखी तक्रार केली. त्यानुसार संबंधित मुख्याध्यापक रवी सोनवणे याच्याविरुध्द पोक्सो व अॅट्रासिटी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला. आज सकाळी मुख्याध्यापक रवी सोनवणे यास पोलिसांनी अटक केली आहे.
नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात अल्पवयीन मुलीची गैरकृत्य केल्याच्या दोन घटना घडल्या असून, विद्यार्थिनीच्या सुरक्षेततेसाठी शाळा प्रशासनाकडून कुठल्या उपाययोजना केल्या जातात व शाळेची सुरक्षा कितपत सक्षम आहे, असे गंभीर प्रश्न आता पालकांकडून व्यक्त होत आहेत. पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी रवी सोनवणे यास अटक करण्यात आली असून, त्याची सखोल चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात आले.



























































