मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर बांगलादेशचे नवे राष्ट्रपती, २५५ खासदारांचं मिळालं समर्थन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (BNP) ज्येष्ठ नेते मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांची बांगलादेशच्या २३ व्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे. टीव्ही९ भारतवर्षच्यावृत्तानुसार, संसदेत पार पडलेल्या या ऐतिहासिक निवडणुकीत मिर्झा फखरुल यांनी २५५ मते मिळवून विरोधी आघाडीचे उमेदवार कर्नल (निवृत्त) ओली अहमद यांचा पराभव केला. ओली अहमद यांना केवळ ८८ मते मिळाली. मुख्य निवडणूक आयुक्त ए. एस. एम. नासिर उद्दीन यांनी मतमोजणीनंतर निकालांची अधिकृत घोषणा केली.

बांगलादेशच्या राजकीय इतिहासात तब्बल ३५ वर्षांनंतर राष्ट्रपती पदासाठी एकापेक्षा जास्त उमेदवार रिंगणात उतरल्याने थेट निवडणूक पाहायला मिळाली. यापूर्वी १९९१ नंतरच्या बहुतांश निवडणुकांमध्ये राष्ट्रपतींची निवड बिनविरोध होत आली होती. संसदेतील ३४९ खासदारांपैकी ३४३ खासदारांनी या मतदानात सहभाग नोंदवला. सत्ताधारी बीएनपी पक्षाचे बहुमत आणि इतर खासदारांचा पाठिंबा मिळवत मिर्झा फखरुल यांनी सहज विजय मिळवला.

दरम्यान, माजी राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी प्रकृतीच्या कारणास्तव मुदतीपूर्वीच जुलै महिन्यात आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. संविधानातील तरतुदींनुसार पद रिक्त झाल्यानंतर ९० दिवसांच्या आत ही निवडणूक घेणे बंधनकारक होते. या काळात संसदेचे अध्यक्ष हाफिज उद्दीन अहमद यांनी प्रभारी राष्ट्रपती म्हणून कारभार पाहिला. अखेर गुरुवारी दुपारी २ ते ५ या वेळेत मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नव्या राष्ट्रपतींची घोषणा करण्यात आली.

७८ वर्षीय मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर हे बांगलादेशच्या राजकारणातील अत्यंत अनुभवी आणि प्रभावी नेते मानले जातात. त्यांनी प्रदीर्घ काळ बीएनपीचे सरचिटणीसपद भूषवले असून पक्षाच्या कठीण काळात त्यांनी संघटनात्मक नेतृत्व केले आहे. १९७१ च्या मुक्तिसंग्रामातील सहभागापासून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास आता देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदापर्यंत पोहोचला आहे. नवनिर्वाचित राष्ट्रपती मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांचा शपथविधी सोहळा २१ ऑगस्ट रोजी बंगभवनातील दरबार हॉलमध्ये पार पडणार आहे.