बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्याप्रकरणी दिल्लीत दोघांना अटक, आरोपींकडून बंदुका आणि जिवंत काडतुसे जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्याप्रकरणी ईशान्य दिल्लीत दोघांना अटक करण्यात आली आहे. विशाल ऊर्फ पुचू आणि सागर ऊर्फ बिरयानी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून शस्त्रे आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती एका अधिकाऱ्याने गुरुवारी दिली.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, गोकलपुरी भागात रात्रीच्या गस्तीदरम्यान पोलिसांनी या दोघांना परिसरातील वेगवेगळ्या डीडीए उद्यानांमध्ये संशयास्पद हालचाली करताना पाहिले आणि त्यानंतर त्यांना अटक केली, असे अधिकाऱ्याने सांगितले.

डी-ब्लॉकमधील डीडीए उद्यानात पोलिसांचे पथक दिसताच विशाल पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला, परंतु त्याला पकडण्यात आले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

ए-ब्लॉकमधील डीडीए उद्यानात झालेल्या दुसऱ्या एका कारवाईत, अडवण्याचा प्रयत्न केला असता सागर पळून गेला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे जप्त केली.

हे दोघे सोशल मीडियावर बंदुकांचे प्रदर्शन करताना एकत्र दिसल्याचे तपासादरम्यान आढळून आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणी गोकलपुरी पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू आहे.