
केसांना नैसर्गिक रंग, चमक आणि घनता मिळावी यासाठी अनेक जण मेहंदीचा वापर करतात. मात्र, मेहंदी लावल्यानंतर ती किती वेळ ठेवायची आणि केस कसे झाकायचे, याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यांच्या मते, मेहंदी लावल्यानंतर काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
अनेक जण केसांना मेहंदी लावल्यानंतर ते तसेच मोकळे सोडतात. मात्र ही योग्य पद्धत नाही. मेहंदी लावल्यानंतर केस प्लास्टिकच्या कॅपने किंवा कव्हरने व्यवस्थित झाकणे गरजेचे आहे. केस मोकळे राहिल्यास मेहंदी व्यवस्थित काम करू शकत नाही. त्यामुळे मेहंदी लावल्यानंतर संपूर्ण केस व्यवस्थित कव्हर करावेत.
मेहंदी जास्त वेळ केसांवर ठेवल्यास रंग अधिक चांगला येईल, असे अनेकांना वाटते. मात्र, तसे करणे योग्य नसल्याचे सांगितले जाते. मेहंदी साधारण २ ते ३ तास केसांवर ठेवावी आणि त्यानंतर केस पाण्याने व्यवस्थित धुवावेत. जास्त वेळ मेहंदी लावून ठेवल्यास केसांमध्ये कोरडेपणा आणि रुक्षपणा वाढू शकतो.
त्यामुळे केसांना मेहंदी लावताना ती व्यवस्थित लावण्यासोबतच केस झाकणे आणि योग्य वेळेनंतर मेहंदी धुणे, या गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.























































