
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील हट्टा गावात अल्पवयीन मुलीला बिस्कीट व पैशाचे अमिष दाखवून शेतात नेऊन सामुहिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. १३ ऑगस्ट रोजी ही घटना घडली असून सुरुवातीला मुलीने हा प्रकार कुटुंबियांपासून लपवला होता. मात्र तिच्या कुटुंबियांना तिच्या वागण्यात बदल जाणवल्याने त्यांनी तिची चौकशी केली. तेव्हा तिने तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरण कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर तिघांना अटक केली आहे. तर अद्याप एक जण फरार आहे.
वसमत तालुक्यातील एका गावातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे कुटुंबीय बाहेरगावे गेले होते. यावेळी तिघा आरोपींनी तिला बिस्कीट व ५० रुपये देण्याचे अमिष दाखवून दुचाकीवर बसवून हट्टा शिवारातील ऊसाच्या शेतात नेले. त्यानंतर तिथे तिच्यावर सामुहिक अत्याचार केला. या प्रकारामुळे सदर मुलगी चांगलीच घाबरून गेली होती. याबाबत त्यांनी मुलीकडे विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. तिघा जणांनी बिस्कीट व ५० रुपयांचे अमिष दाखवून ऊसाच्या शेतात नेऊन अत्याचार केल्याचे सांगितले. या शिवाय काही दिवसांपुर्वीच गावातील एका तरुणाने बिस्कीटचे अमिष दाखवून जबरदस्तीने अत्याचार केल्याचेही त्या मुलीने कुटुंबियांनी सांगितले.
मुलीच्या कुटुंबियांनी बुधवारी रात्री उशीराने हट्टा पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस. जी. केंद्रे यांनी आरोपी विजय खाडे, लखन खाडे, प्रविण खाडे, प्रकाश खाडे या चौघांवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन हट्टा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर, उपनिरीक्षक संजय केंद्रे यांच्या पथकाने तत्काळ आरोपींचा शोध घेऊन लखन खाडे, प्रविण खाडे, प्रकाश खाडे या तिघांना ताब्यात घेतले. फरार असलेल्या विजय खाडेचा पोलिसांकडून शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.




























































