
गुजरातमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. येथील वडोदरा शहरात बसच्या स्वयंचलित दारात मान अडकल्यामुळे ७ वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वडोदरा येथील सूर्यनगर-तरसाली बायपास ते धन्यावी मार्गावर एका रिपेयरिंग वर्कशॉपमध्ये ही बस उभी होती. यावेळी या लक्झरी बसच्या ऑटोमॅटिक दारात मान अडकून 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. दिवेश असे मृत मुलाचे नाव असून, तो प्रसादा आणण्यासाठी घराबाहेर पडला होता. “मी प्रसाद आणायला जातो,” असे सांगून घरून बाहेर पडलेला मुलगा काही क्षणातच या भीषण अपघाताचा बळी ठरल्याने, संबंधित कामगार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या हदयद्रावक घटनेची माहिती मिळताच कपुराई पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून गुन्हा नोंदवला असून, या संपूर्ण दुर्घटनेचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे, मात्र या घटनेदरम्यानचा 15 मिनिटांचा सीसीटीव्ही फुटेज गायब असल्यामुळे खळबळ उडाली आहे. वीज खंडित झाल्यामुळे हे फुटेज नसल्याचे प्राथमिक कारण सांगितले जात असले तरी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहेत.
कपूरराई पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, मृतदेहाची पंचनामा प्रक्रिया आणि शवविच्छेदन करून पोलीस तांत्रिक बाबींसह सर्वच अंगांनी सखोल तपास करत आहेत.


























































