
प्रेमाला सीमांचे बंधन नसते, याची प्रचिती देणारा एक अनोखा विवाह केरळमध्ये पार पडला आहे. ब्रिटनच्या संसदेचे माजी सदस्य आणि सध्याचे स्कॉटिश संसद सदस्य मार्टिन डे यांनी केरळच्या पिरावोम येथील मल्याळी तरुणी निधीन चंदी (Nidhin Chandh) हिच्याशी लग्न केले. त्रिशूरमधील प्रसिद्ध श्री गुरुवायूर मंदिरात हिंदू पारंपरिक पद्धतीने विवाह केला. या अनोख्या विवाह सोहळ्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
हा विवाह सोहळा मंगळवारी सकाळी ११ वाजता गुरुवायूर मंदिरात पार पडला, त्यानंतर ‘पुष्पांजली ऑडिटोरियम’मध्ये स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला दोघांचे जवळचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि निधीन यांचा २२ वर्षांचा मुलगा वेदिक शंकर आवर्जून उपस्थित होता.
निधीन या केरळमधील सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी के. एन. चंदी आणि माजी ग्रामपंचायत सदस्य राजी यांच्या कन्या आहेत. त्या २००८ मध्ये ‘आयटी मॅनेजमेंट’च्या उच्च शिक्षणासाठी ब्रिटनमध्ये गेल्या होत्या. तिथे त्यांनी नंतर पीएचडीही पूर्ण केली. दरम्यान, ब्रिटनमधील व्हिसा नियमांत झालेल्या बदलांमुळे निधीन यांचा व्हिसा रद्द झाला होता. त्या वेळी या अन्यायाविरोधात त्यांनी ब्रिटिश संसदीय समित्यांसमोर दाद मागितली. याच लढ्यादरम्यान, फेब्रुवारी २०१६ मध्ये त्यांची भेट तत्कालीन ब्रिटिश खासदार मार्टिन डे यांच्याशी झाली. सुरुवातीला दोघांमध्ये मैत्री झाली, आणि दोन महिन्यांतच मार्टिन यांनी निधीन यांना प्रेमाची कबुली दिली.
संकटाच्या काळात दिली खंबीर साथ
त्या वेळी निधीन घटस्फोटित होत्या आणि १२ वर्षांच्या मुलाची आई होत्या. शिवाय त्यांच्याकडे नोकरी किंवा कायदेशीर व्हिसाचा दर्जाही नव्हता. मात्र, मार्टिन यांनी कोणत्याही अटीशिवाय निधीन यांना साथ दिली. मार्टिन यांच्या आई-वडिलांनीही निधीन यांना प्रेमाने स्वीकारले. सध्या निधीन या ब्रिटनमध्ये मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून, त्यांचा मुलगा वेदिक एडिनबर्गमध्ये एका नामांकित कंपनीत वरिष्ठ डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर आहे.
९ वर्षांनंतर पूर्ण झाली गुरुवायूर मंदिरातील लग्नाची इच्छा
निधीन यांची सुरुवातीपासूनच गुरुवायूर मंदिरात लग्न करण्याची तीव्र इच्छा होती. मात्र, व्हिसाच्या अडचणींमुळे दोघांनी ९ वर्षांपूर्वी ब्रिटनमध्ये नोंदणी पद्धतीने (Court Marriage) लग्न केले होते. त्यानंतर मार्टिन यांनी २०१८, २०२० आणि २०२३ मध्ये केरळला भेटी दिल्या; मात्र पूर परिस्थिती, कोरोनाची साथ आणि कुटुंबातील आजारपण यामुळे गुरुवायूर मंदिरात येणे शक्य झाले नव्हते. अखेर चौथ्या दौऱ्यात, अधिकृत लग्नाच्या ९ वर्षांनंतर, या जोडप्याने पारंपरिक विधींनुसार मंदिरात लग्न करत आपली अपूर्ण इच्छा पूर्ण केली.
मार्टिन डे हे १९९९ पासून सार्वजनिक सेवेत सक्रिय असून त्यांनी ब्रिटनचे खासदार म्हणून ९ वर्षे (तीन टर्म) काम केले आहे. सध्या ते स्कॉटिश संसदेत ‘ऑल-पार्टी पार्लमेंटरी ग्रुप फॉर इंडिया’चे अध्यक्ष आहेत.


























































