
सुपरस्टार रजनीकांतच्या बहुप्रतीक्षित ‘जेलर 2 ’ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित हा चित्रपट 15 ऑक्टोबर 2026 ला प्रदर्शित होणार आहे. पहिल्या ‘जेलर’प्रमाणेच या चित्रपटातही एक खास डान्स नंबर पाहायला मिळणार आहे. मात्र, यावेळी या गाण्यात तमन्ना भाटिया दिसणार नसून अभिनेत्री आणि व्यावसायिक नृत्यांगना शमना कासिम आपल्या नृत्याची जादू दाखवणार आहे.
टीव्ही 9 ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘जेलर’च्या पहिल्या भागात तमन्ना भाटियाच्या ‘कवाला’ या गाण्याने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. रजनीकांत आणि तमन्नाच्या या गाण्याने सोशल मीडियावरही मोठी क्रेझ निर्माण केली होती. त्यामुळे ‘जेलर 2’मधील डान्स नंबरचीही चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. आता निर्मात्यांनी या गाण्याची पहिली झलक दाखवत चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवली आहे.
सन पिक्चर्सच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून ‘अला बोलेलो’ या चित्रपटातील पहिल्या गाण्याचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. हे गाणे 21 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. या प्रोमोमध्ये शमना कासिम पांढऱ्या साडीत नृत्य करताना दिसत आहे. तिच्या या लूकने आणि नृत्याच्या अंदाजाने सोशल मीडियावर चर्चेला सुरुवात झाली आहे.
‘अला बोलेलो’चा प्रोमो समोर आल्यानंतर त्याची तुलना ‘जेलर’मधील तमन्ना भाटियाच्या ‘कवाला’ या सुपरहिट गाण्याशी केली जात आहे. पहिल्या भागातील ‘कवाला’ने प्रेक्षकांवर मोठी छाप पाडली होती. त्यामुळे ‘जेलर 2’मधील शमना कासिमचा डान्स नंबर त्या गाण्याची जागा घेऊ शकतो का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
शमना कासिम ही अभिनेत्री असण्यासोबतच प्रशिक्षित आणि व्यावसायिक नृत्यांगना आहे. तिचा स्वतःचा ‘शमना कासिम डान्स स्टुडिओ’ देखील आहे. त्यामुळे मोठ्या सुपरस्टारच्या चित्रपटातील डान्स नंबरमध्ये तिची निवड झाल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

























































