फरार मेहुल चोक्सीच्या वकिलाला लंडनमध्ये अटक, लैंगिक अत्याचार प्रकरणी कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी फरार व्यावसायिक मेहुल चोक्सीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाला लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे. विजय अग्रवाल असे अटक केलेल्या वकिलाचेनाव असून, त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचे चार आरोप ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती मेट्रोपॉलिटन पोलिसांनी गुरुवारी दिली.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, अग्रवाल याला गेल्या आठवड्यात मंगळवारी ब्रिटनची राजधानी लंडनमधील उच्चभ्रू मेफेअर परिसरातून अटक करण्यात आली. अग्रवालने फसवणूक आणि मनी लाँड्रिंगच्या खटल्यांमध्ये चोक्सीचे प्रतिनिधित्व केले आहे. अटक केल्यानंतर अग्रवाल याला लंडनमधील वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट्स कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने 10 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

अग्रवालसह मनप्रीत कौर नामक महिलेलाही घटनास्थळी अटक करण्यात आली आहे. मनप्रीतवर लैंगिक अत्याचारास जाणीवपूर्वक प्रोत्साहन किंवा मदत केल्याचे दोन आरोप ठेवण्यात आले आहेत. न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, हे कथित गुन्हे मे महिन्यात आणि या महिन्याच्या सुरुवातीच्या काळातील आहेत. दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.