निवडणूक आयोगाने आपले चिन्ह बदलून साखळी आणि कुलूप करावे; उत्तराखंडमधील मतदार यादीतील गैरव्यवहाराचा आरोप, काँग्रेस आक्रमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तराखंडमधील एसआयआर प्रक्रियेदरम्यान मतदार यादीतून मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा आणि त्यात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत काँग्रेस नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या (ECI) मुख्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली. काँग्रेस नेते पवन खेरा यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर अत्यंत तीव्र शब्दांत आक्षेप घेत, “निवडणूक आयोगाने आता आपले अधिकृत चिन्ह बदलून साखळी आणि कुलूप करायला हवे,” असा हल्लाबोल केला. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

काँग्रेस खासदार कुमारी शैलजा, पवन खेरा आणि उत्तराखंड काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या शिष्टमंडळाने या मुद्द्यावर निवेदन देण्यासाठी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र भेट न मिळाल्याने नेत्यांनी मुख्यालयाबाहेरच आंदोलन केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना पवन खेरा म्हणाले की, लोकशाहीत निवडणूक आयोगाने देशातील जनतेसाठी आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींसाठी स्वतःचे दरवाजे बंद करून त्यांना मोठे कुलूप लावले आहे. ही देशातील लोकशाहीची सध्याची वास्तव स्थिती आहे. गेल्या आठ दिवसांपासून भेटीची वेळ मागूनही ती नाकारण्यात आल्यामुळे थेट कार्यालयाबाहेर येणे भाग पडल्याचे त्यांनी सांगितले.

उत्तराखंड काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गणेश गोदियाल यांनी मतदार यादीतील गोंधळाची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, उत्तराखंडमध्ये एका अज्ञात व्यक्तीच्या तक्रारीवरून विद्यमान आमदाराचे नाव मतदार यादीतून वगळण्याचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडून विचारात घेतला जात आहे. प्रत्यक्षात त्या तक्रारदाराकडे विचारणा केली असता, त्याने कोणतीही तक्रार केली नसल्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट केले आहे. अशा प्रकारच्या बनावट तक्रारींचा वापर करून मतदारांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा आणि काँग्रेस पक्षाला कमकुवत करण्याचा हा कट असल्याचा आरोप गोदियाल यांनी केला. जर आयोग यावर केवळ मूकदर्शक बनून राहणार असेल, तर जनता हे सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.