ऐतिहासिक क्षण… जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत त्रिशा-गायत्रीची उपांत्य फेरीत धडक; 15 वर्षानंतर महिला दुहेरीत पदक निश्चित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये शुक्रवारचा दिवस हिंदुस्थानसाठी ऐतिहासिक असाच ठरला. महिला दुपेरीमध्ये त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. त्रिशा-गायत्रीने चीनच्या चौथ्या मानांकित जोडीचा तीन सेटमध्ये रंगलेल्या थरारक लढतीत पराभव करत पदक निश्चित केले आहे. विशेष म्हणजे जागतिक स्पर्धेच्या महिला दुहेरीत हिंदुस्थानचा 15 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपुष्टात आला आहे.

नवी दिल्लीतील इंदिरा गांधी अरेना येथे पार पडलेल्या या सामन्यात जागतिक क्रमवारीत 39 व्या स्थानी असलेल्या त्रिशा आणि गायत्रीसमोर चीनच्या जिया यी फान आणि झांग शू शियान या जोडीचे आव्हान होते. पहिल्या गेममध्ये चिनी जोडीने आक्रमक सुरुवात केली. त्रिशा-गायत्रीचे स्मॅश परतवून लावत चिनी जोडीने पहिला गेम 21-16 असा नावावर केला.

पहिला गेम गमावल्यानंतर हिंदुस्थानच्या जोडीने जोरदार कमबॅक केले. चिनी जोडीवर वर्चस्व गाजवत त्रिशा-गायत्रीने दुसरा गेम 21-15 असा जिंकत सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली. त्यानंतर निर्णायक गेममध्ये त्रिशा-गायत्रीने पूर्णपणे वर्चस्व गाजवले. हा गेम 21-13 असा जिंकत त्रिशा-गायत्रीने ऐतिहासिक विजयाची नोंद केली आणि उपांत्य फेरीमध्ये धडक दिली.

दरम्यान, याआधी 2011 मध्ये लंडन येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा या जोडीने महिला दुहेरीत कांस्यपदक पटकावले होते. त्यानंतर तब्बल 15 वर्षांनी हिंदुस्थानला महिला दुहेरीमध्ये पदक मिळवण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे यजमान हिंदुस्थानसाठी हे पदक अत्यंत महत्वाचे आहे. कारण महिला आणि पुरुष एकेरीमध्ये हिंदुस्थानचे आव्हान याआधीच संपुष्टात आलेले आहे.

एकेरीमध्ये पी. व्ही. सिंधू, लक्ष्य सेन, उन्नती हुड्डा आणि आयुष शेट्टी यांचे पॅकअप झाले आहे. तर दुसरीकडे पुरूष दुहेरीमध्ये सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी पदकाच्या शर्यतीत कायम आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्यांचा सामना चीनच्या तिसऱ्या मानांकित लिआंग वेई केंग आणि वांग चांग या जोडीशी होणार आहे. या सामन्यात विजय मिळवल्यास हिंदुस्थानचे आणखी एक पदक निश्चित होईल.