
अंगणवाडीमध्ये लहान मुलांना मिळणाऱ्या पोषण आहाराबाबत तक्रार करणाऱ्या अंगणवाडी सेविकेवरच निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. रेश्मा शिवाजी पारधी असे अंगणवाडी सेविकेचे नाव आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील नंबरवाडी येथे हा प्रकार घडला असून प्रशासनाच्या उफराटा न्यायावर चौफेर टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही याबाबत एक्सवर पोस्ट करत सरकारवर हल्ला चढवला आहे.
अंगणवाडीतील मुलांना पोषण आहार म्हणून देण्यात येणारा वाटाणा आणि भरडा शिजत नसल्याची तक्रार करणाऱ्या आंबेगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविका रेश्मा पारधी यांचं कौतुक करण्याऐवजी त्यांचंच निलंबन करण्याचा तुघलकी निर्णय या सरकारने घेतला. चोर सोडून सन्याशाला फाशी देणारं वाह रे सरकार! अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.
व्यवस्था सुधारण्याऐवजी सत्य बोलणाऱ्याचा गळा दाबून सरकार काय लपवतंय? अंगणवाडीतील बालकांच्या ताटातही आडवा हात मारणाऱ्यांवर कारवाई करण्याची हिंमत सरकारने दाखवावी. गैरप्रकारावर आवाज उठवाल तर कारवाई करू, हा मेसेज या सरकारला या कारवाईतून द्यायचाय का? असा सवाल करत तातडीने रेश्मा पारधी यांचं निलंबन रद्द करून निकृष्ट पोषण आहार पुरवणाऱ्यांची पुढील दहा दिवसांत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.
अंगणवाडीतील मुलांना पोषण आहार म्हणून देण्यात येणारा वाटाणा आणि भरडा शिजत नसल्याची तक्रार करणाऱ्या आंबेगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविका रेश्मा पारधी यांचं कौतुक करण्याऐवजी त्यांचंच निलंबन करण्याचा तुघलकी निर्णय या सरकारने घेतला.
चोर सोडून सन्याशाला फाशी देणारं वाह रे सरकार!… pic.twitter.com/79KWjjkmAr— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 21, 2026
नेमकं प्रकरण काय?
रेश्मा शिवाजी पारधी या आंबेगाव तालुक्यातील नंबरवाडी येथील अंगणवाडीवर कार्यरत होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांनी एक व्हिडीओ चित्रित करत पोषण आहाराबाबत तक्रार केली होती. पोषण आहारातील वाटाणा आणि भरडा नऊ-दहा शिट्ट्यानंतरही शिजत नाही, त्यामुळे नाईलाजास्तव तसाच मुलांना खाऊ घालावा लागातो, असे त्या म्हणाल्या होत्या. या व्हिडीओनंतर पुणे जिल्हा परिषदेने एक आदेश काढत रेश्मा पारधी यांच्यावर कारवाई केली. कार्यालयीन शिस्त सोडून वागल्यामुळे, तसेच वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान केल्यामुळे अंगणवाडी सेविका या पदावरून कायमस्वरूपी कमी करण्यात आले, असे आदेशात नमूद करण्यात आले. हा प्रकार समोर येताच विरोधकांनी सरकारच्या भोंगळ कारभारावर सडकून टीका केली आहे.





























































