११ वी आणि १२ वीसाठी राज्यशास्त्राची नवीन पुस्तके; ‘एनसीईआरटी’ने २० सदस्यीय टीम बनवली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अर्थात एनसीईआरटीने इयत्ता ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना शिकवल्या जाणाऱ्या राज्यशास्त्राची नवीन पुस्तके तयार करण्यासाठी २० सदस्यांची पाठ्यपुस्तक विकास संघाची पुनर्रचना केली आहे. नवीन संघ राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणजेच एनईपी २०२० नुसार अभ्यासक्रम आणि पुस्तके तयार करेल. यासाठी प्रा. संदीप शास्त्री यांच्याकडे नेतृत्व देण्यात आले आहे. तर डॉ. वंथांगपुई खोबुंग आणि डॉ. सुभाष सिंग हे समन्वयक म्हणून काम पाहतील.

एनसीईआरटीने बनवलेल्या २० सदस्यीय टीममध्ये किमान चार सदस्य हे आरएसएस संघटनांशी संबंधित जोडलेले आहेत. एनसीईआरटीने ११ वीच्या राज्यशास्त्र विषयाचे पुस्तक ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत तयार करण्याचे ठरवले आहे. तर १२ वीचे पुस्तक हे ३० जुलै २०२७ पर्यंत तयार केले जाईल.

चार सदस्य ‘आरएसएस ‘चे
यदुनाथ देशपांडे हे एबीव्हीपीमध्ये संघटनात्मक पदावर होते. डॉ. प्रशांत दिवेकर हे पुण्यातील ज्ञान प्रबोधिनीमध्ये काम करतात. प्रा. वंदना मिश्रा या जेएनयू येथील प्राध्यापिका आणि एबीव्हीपीच्या माजी राष्ट्रीय सचिव राहिलेल्या आहेत. डॉ. रवी रमेशचंद्र शुक्ल हे जेएनयूमध्ये सहाय्यक प्राध्यापक असून ते आरएसएसशी संलग्न असलेल्या एका मासिकाच्या संपादकीय मंडळावर आहेत.