
गृहपाठ पूर्ण केला नाही म्हणून शिक्षिकेने चापट मारली आणि एलकेजीमधील 6 वर्षांच्या मुलाचा वर्गात कोसळून मृत्यू झाला. आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणममध्ये ही घटना घडली असून वर्गातील हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून पालकांनी शाळेबाहेर जोरदार निदर्शने केली.
प्रणव तेजा (वय – 6) असे मृत विद्यार्थ्यांचे नाव असून तो लिटर गार्डनर स्कूलमध्ये एलकेजीमध्ये शिकत होतो. गुरुवारी तो नेहमीप्रमाणे शाळेत गेला. मात्र, गृहपाठ केला नसल्याने संतापलेल्या शिक्षिकेने कॉलर पकडून त्याच्यावर ओरडण्यास सुरुवात केली. यामुळे घाबरलेला चिमुकला मोठ्याने रडू लागला व गयावया करू लागला. त्यानंतर शिक्षिकेने त्याच्या कपड्यांची नीट फेररचना करत त्याला गालावर जोरदार चापट मारली. या प्रसंगानंतर काही सेकंदांतच चिमुकल्याला खोकला आला आणि घाबरून तो शिक्षिकेच्या अंगावरच कोसळला. उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, शाळेतील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून त्यात शिक्षिका मुलाला रागवत असताना आणि मुलगा गयावया करत असताना स्पष्ट दिसत आहे. मारहाणीनंतर चिमुकला बेशुद्ध पडल्याचे आणि शिक्षिकेने त्याला उठवण्याचा प्रयत्न केल्याचेही फुटेजमध्ये कैद झाले आहे.
A 6-year-old UKG student, Pranay Teja, died after at a private school. His family alleges he was beaten by a teacher over unfinished homework. Police are investigating, the exact cause of death awaits medical and postmortem findings. Family members have staged a protest at KGH,… pic.twitter.com/HQG7NIAu9C
— Ashish (@KP_Aashish) August 20, 2026
मुलगा सकाळी पूर्णपणे सुदृढ होता आणि त्याला कोणताही आजार नव्हता. घडलेल्या घटनेची कोणतीही माहिती शाळा प्रशासनाने कुटुंबाला दिली नाही. स्थानिकांकडून आम्हाला ही बातमी समजली, असा आरोप करत आरोपी शिक्षिका आणि शाळा प्रशासनाविरोधात कडक कारवाईची मागणी मृत मुलाच्या वडिलांनी केली.
शासनाची दखल आणि कायदेशीर कारवाई
आंध्र प्रदेशचे मनुष्यबळ विकास मंत्री नारा लोकेश यांनी या घटनेवर तीव्र दुख: व्यक्त केले आहे. पीडित कुटुंबाला सांत्वन देत त्यांनी दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आणि शाळा प्रशासनाला सोडणार नसल्याचे आश्वासन दिले आहे. सध्या पोलिसांनी भादवि कलम 194 अंतर्गत संशयास्पद मृत्यूची नोंद केली आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येत असून, त्याचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. पोलीस सध्या शाळेतील कर्मचारी व प्रत्यक्षदर्शींची चौकशी करत आहेत.


























































