
हिंदुस्थानचे लक्ष सध्या पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाकडे असले तरी, भविष्यात आणि दीर्घकाळात हिंदुस्थानसमोरील सर्वात मोठे आव्हान पाकिस्तान नसून चीन हेच असणार आहे. चीनसोबतचे वाद संवादाने सोडवण्यावर भर दिला पाहिजे, मात्र देशात शांतता टिकवून ठेवायची असेल, तर आपल्या सशस्त्र दलांनी युद्धासाठी नेहमी सज्ज असले पाहिजे, असे महत्त्वपूर्ण विधान हिंदुस्थानचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी केले आहे.
पुण्यामध्ये गुरुवारी जनरल मनोज नरवणे यांच्या ‘द क्युरिअस अँड द क्लासिफाइड: अनअर्थिंग मिलिटरी मिथ्स अँड मिस्ट्रीज’ या नव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या वेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी देशासमोरील सुरक्षा आव्हाने, शेजारील राष्ट्रांसोबतचे संबंध आणि लष्करी सज्जता यावर सविस्तर भाष्य केले. ‘पीटीआय‘ने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे.
पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांसोबत हिंदुस्थानने युद्धे लढली असून दोन्ही सीमांवर तणाव आहे. यावर बोलताना जनरल नरवणे म्हणाले की, पाकिस्तान आणि चीन हे दोन पूर्णपणे वेगळे विषय आहेत. पाकिस्तानकडून सातत्याने दहशतवादाला मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे आपले तातडीचे लक्ष पश्चिमेकडील सीमेवर असते. मात्र, आगामी काळात चीन हाच आपला मुख्य स्पर्धक असेल. विशेष म्हणजे, या वेळी त्यांनी चीनचा उल्लेख शत्रू असा न करता जाणीवपूर्वक स्पर्धक असा केला. राजकारण, अर्थव्यवस्था, व्यापार आणि लष्करी अशा सर्वच आघाड्यांवर चीन हिंदुस्थानशी स्पर्धा करेल आणि जिथे स्पर्धा असते, तिथे थोडाफार संघर्ष अटळ असतो, असे ते म्हणाले.
चीनसोबतचे वाद संवादाने आणि राजनैतिक मार्गाने सोडवण्यावर हिंदुस्थानने नेहमी भर दिला पाहिजे. बळाचा वापर हा नेहमीच शेवटचा पर्याय असावा. मात्र, जेव्हा चर्चेतून मार्ग निघत नाही, तेव्हा शत्रूला कोणत्याही चुकीच्या साहसापासून रोखण्यासाठी देशाकडे भक्कम लष्करी ताकद असणे आवश्यक असते. त्यामुळेच हिंदुस्थानच्या सशस्त्र दलांनी नेहमी सज्ज असले पाहिजे. जर तुम्हाला शांतता हवी असेल, तर युद्धासाठी सज्ज राहा, असे ते म्हणाले.
नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि म्यानमार यांसारख्या शेजारील देशांमध्ये राजकीय स्थैर्य असणे हिंदुस्थानच्या स्वतःच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक असल्याचे नरवणे यांनी अधोरेखित केले. आपण आपले शेजारी निवडू शकत नाही. जर शेजारील देश जळत असेल, तर त्याचा आनंद मानण्याचे काहीच कारण नाही, असे सांगत त्यांनी म्यानमारमधून हिंदुस्थानात येणाऱ्या निर्वासितांचे उदाहरण दिले. शेजारील देशांमध्ये अस्थिरता असेल, तर तिथून निर्वासितांचे लोंढे हिंदुस्थानात येतात. याशिवाय अमली पदार्थांची तस्करी आणि बेकायदेशीर शस्त्रास्त्रांची ने-आण वाढते, ज्याचा थेट फटका हिंदुस्थानला बसतो. त्यामुळे या देशांमध्ये स्थैर्य प्रस्थापित होण्यासाठी आपण त्यांना मदत केली पाहिजे, अशी भूमिकाही जनरल नरवणे यांनी मांडली.


























































