हैदराबादमध्ये भरधाव कारच्या धडकेत तरुणीचा मृत्यू; खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हैदराबादमधील ज्युबिली हिल्स परिसरात अपघाताची धक्कादायक घटना घडली. येथे एका मॉलबाहेर भरधाव वेगात असलेल्या खासदाराच्या मुलाच्या कारने एका 26 वर्षीय तरुणीला धडक दिली. या अपघातात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत तरुणीचे नाव भारती मुखी असून, ती त्याच मॉलमध्ये सेल्सवुमन म्हणून काम करत होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, 16 ऑगस्ट रोजी दुपारी जेवण करून ती कामावर परतत असताना हा भीषण अपघात घडला. या धडकेत भारती यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर तिला तातडीने त्याच लक्झरी कारमधून रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

याप्रकरणी हैदराबादच्या मादामपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आंध्र प्रदेशातील जनसेना पक्षाचे (JSP) राज्यसभा खासदार लिंगमनेनी रमेश यांचा 23 वर्षीय मुलगा संजुश याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संकलित केलेल्या पुराव्यांवरून घटनेच्या वेळी संजुशच गाडी चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी या प्रकरणी संजुशविरुद्ध कायदेशीर नोटीस बजावली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान या गंभीर दुर्घटनेवर खासदार लिंगमनेनी रमेश यांच्याकडून तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.