
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात उगम पावलेल्या आणि आपल्या धिप्पाड शरीरासाठी व जलद वाढीसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘माडग्याळ मेंढी’च्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) राष्ट्रीय पशू अनुवंशिक संसाधन ब्युरो (NBAGR), कर्नालद्वारे माडग्याळ मेंढीला ‘स्वतंत्र देशी मेंढी जात’ म्हणून अधिकृत मान्यता देण्यात आली आहे.
दिनांक ७ ऑगस्ट रोजी आयोजित ICARच्या १४व्या ‘ब्रीड रजिस्ट्रेशन कमिटी’च्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. याबाबतचे अधिकृत पत्र ICAR-NBAGRचे संचालक डॉ. एन. एच. मोहन यांनी १८ रोजी महाराष्ट्राच्या पशुसंवर्धन आयुक्तांना पाठवले आहे.
यासंदर्भात जिल्हा उपायुक्त डॉ. अजयनाथ थोरे यांनी आनंद व्यक्त केला. जत तालुक्यातील सिद्धनाथ खोरे, माडग्याळ तसेच आटपाडी तालुका तसेच कवठेमहांकाळ तालुक्याच्या काही भागात वर्षानुवर्षे मेंढीपालन केले जाते. माडग्याळ जात म्हणून मान्यता मिळाल्यामुळे मेंढीपालन व्यवसायास उभारी मिळून शाश्वत बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. या मान्यतेकरिता पशुसंवर्धन विभाग गेले तीन वर्षे प्रयत्न करीत असून, तीन वर्षांच्या पाठपुराव्याला यश आले आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
‘माडग्याळ मेंढी’चे वैशिष्ट्य
माडग्याळ मेंढी ही तिच्या लांब व उंच शरीरयष्टी, वैशिष्ट्यपूर्ण बाकदार नाक (रोमन नोज), लांब कान आणि जलद वजन वाढण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे. सांगली जिल्ह्यातील जत, कवठेमहांकाळ, आटपाडी व लगतच्या भागात या मेंढीचे संगोपन मोठ्या प्रमाणावर केले जाते. कमी पाण्यात व प्रतिकूल हवामानात टिकून राहण्याची अफाट क्षमता हे या प्रजातीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
राष्ट्रीय मान्यतेमुळे भविष्यात होणारे प्रमुख फायदे
स्वतंत्र ‘अॅक्सेशन नंबर’ मिळाल्यामुळे आता या प्रजातीचे संवर्धन वैज्ञानिक पद्धतीने केले जाईल. संकरित प्रजननामुळे मूळ जात नष्ट होण्याचा धोका टळेल. केंद्र व राज्य शासनाकडून माडग्याळ मेंढीच्या पैदास, संशोधन व पैदासकारांच्या विकासासाठी विशेष अर्थसंकल्प, योजना व अनुदान उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पशुपालकांच्या उत्पन्नात मोठी वाढ
राष्ट्रीय मान्यतेमुळे माडग्याळ बोकड व मेंढ्यांना अधिकृत बँड व्हॅल्यू प्राप्त होईल. यामुळे देश-परदेशातील बाजारात या मेंढ्यांना चांगला दर मिळेल, ज्याचा थेट फायदा स्थानिक मेंढीपालकांना होईल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व शेळी विकास महामंडळामार्फत माडग्याळ मेंढीचे शुद्ध पैदास केंद्र आणि कृत्रिम रेतनासाठी (AI) सिमेन बँक स्थापन करण्यास गती मिळेल. सांगली व परिसरात माडग्याळ मेंढीपालन हा शाश्वत, सुरक्षित आणि अधिक नफा मिळवून देणारा व्यवसाय बनेल.



























































