
मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमध्ये फार्मसीचे शिक्षण घेत असलेल्या जम्मू आणि काश्मीरमधील दोन काश्मिरी विद्यार्थ्यांना त्यांच्या धार्मिक ओळखीच्या आधारावर त्रास दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. त्यांच्या प्रदेश आणि धर्मामुळे त्यांच्यावर भाड्याची खोली खाली करण्यासाठी दबाव टाकला जात होता. हे प्रकरण उघडकीस येताच पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली. मध्य प्रदेश पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेचे ‘जम्मू-काश्मीर स्टुडंट्स असोसिएशन’ने (JKSA) कौतुक केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रधानमंत्री विशेष शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत (PMSSS) फार्मसीचे शिक्षण घेत असलेल्या या दोन विद्यार्थ्यांना त्यांच्या ओळखीमुळे आणि धर्मामुळे स्थानिकांकडून धमक्या व दबाव टाकला जात होता. पीडित विद्यार्थ्यांना त्यांच्या राहत्या घरातून बळजबरीने हाकलून लावण्यासाठी काही व्यक्तींकडून त्यांच्या घरमालकावर प्रचंड दबाव आणला जात होता. या प्रकारामुळे घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी तातडीने JKSA शी संपर्क साधून आपली आपबीती सांगितली. यानंतर संघटनेचे राष्ट्रीय निमंत्रक नासिर खुएहमी यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत थेट मध्य प्रदेशचे पोलीस महासंचालक कैलास मकवाना यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण माहिती दिली.
या प्रकरणी तात्काळ पावले उचलत, पोलीस महासंचालक मकवाना यांनी भोपाळचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांना संबंधित विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची पूर्ण खात्री करण्याचे कडक निर्देश दिले. या आदेशानंतर निषादपुरा पोलीस ठाण्याचे प्रभारी मनोज पटवा यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पोलीस पथकाने तात्काळ विद्यार्थ्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांची विचारपूस केली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करत विद्यार्थ्यांना धमकावणाऱ्या आणि दबाव आणणाऱ्या संशयित व्यक्तींची कसून चौकशी केली आणि पुढील चौकशीसाठी त्यांना थेट पोलीस ठाण्यात बोलावले. तसेच कोणत्याही विद्यार्थ्यामध्ये भीती किंवा असुरक्षिततेची भावना निर्माण होईल असे वर्तन खपवून घेतले जाणार नाही, असे सक्तीचे निर्देशही दिले.



























































