
भांडुप येथे कोकण महोत्सवात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्याबद्दल भाजप खासदार नारायण राणे यांनी केलेल्या निराधार वक्तव्याप्रकरणी माझगाव दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा खटला सुरू आहे. राणे यांच्याकडून आज, “आम्हाला तडजोड करायची आहे. हा विषय सामोपचाराने मिटवायचा आहे”, असे न्यायालयात सांगण्यात आले.
नारायण राणे यांनी १५ जानेवारी २०२३ रोजी संजय राऊत यांच्याबद्दल निराधार वक्तव्य केले होते. “संजय राऊत यांना मी खासदार बनवले. मतदार यादीत त्यांचे नाव नव्हते; ते टाकण्यासाठी मी पैसे खर्च केले”, असे राणे म्हणाले होते. याप्रकरणी संजय राऊत यांनी अॅड. सार्थक शेट्टी यांच्यामार्फत माझगाव दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे.
या खटल्याची आज दंडाधिकारी आरती कुलकर्णी यांच्यासमोर सुनावणी झाली. तेव्हा अॅड. सतीश मानशिंदे यांनी राणे यांच्या वतीने युक्तिवाद करताना प्रकरण सामोपचाराने मिटवायचे असल्याची विनंती न्यायालयाला केली.
“तडजोडीचा असा कोणताही प्रस्ताव अद्याप राणे यांच्याकडून आमच्याकडे आलेला नाही. प्रस्ताव आला तर त्यावर विचार करू”, असे संजय राऊत यांचे वकील सार्थक शेट्टी यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी १० सप्टेंबरपर्यंत तहकूब केली.

























































