‘वंदे भारत एक्स्प्रेस’खाली आढळला 10 फुटांचा अजगर; रेल्वे स्थानकावर उडाली खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हरिद्वार रेल्वे स्थानकावर गुरुवारी एक धक्कादायक घटना घडली. ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ची साफसफाई करत असताना कर्मचाऱ्यांना डब्याखाली एक भलामोठा अजगर आढळून आला. हा अजगर थेट ट्रेनच्या डब्यात शिरण्याचा प्रयत्न करत होता. या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरात एकच खळबळ उडाली आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डेहराडूनला जाणारी ही ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ गुरुवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास साफसफाई आणि देखभालीसाठी रेल्वे स्थानकावरील ‘वॉशिंग लाईन’वर आणण्यात आली होती. आवश्यक ती सर्व कामे आटोपून ही ट्रेन संध्याकाळी ६ वाजता डेहराडूनच्या दिशेने रवाना होणार होती. मात्र, दुपारी १२ वाजेच्या सुमारास साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनच्या एका डब्याखाली काहीतरी सळसळताना दिसले. जवळ जाऊन पाहिले असता तब्बल १० फूट लांबीचा एक विशाल अजगर आढळून आला. हा अजगर ट्रेनच्या एका डब्यात शिरण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहून कर्मचाऱ्यांची भीतीने गाळण उडाली.

घटनेचे गांभीर्य ओळखून रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ वनविभागाला याची माहिती दिली. माहिती मिळताच हरिद्वार रेंजच्या वन दरोगा आरती पंत, फॉरेस्ट गार्ड राहुल आणि वनकर्मचारी लाखन यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. अजगर ट्रेनच्या खाली असल्यामुळे त्याला बाहेर काढणे आव्हानात्मक होते. मात्र, वनविभागाच्या पथकाने सुमारे २ तासांच्या प्रयत्नांनंतर अत्यंत कौशल्याने या १० फूट लांबीच्या अजगराला सुरक्षितपणे पकडले आणि नंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.

रेल्वे स्थानकावर पकडण्यात आलेल्या या अजगराला नंतर सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले आहे, अशी माहिती हरिद्वार वनविभागाचे परिक्षेत्र अधिकारी शिशपाल सिंग यांनी दिली. या थरारक घटनेमुळे काही काळ कामात व्यत्यय आला असला तरी, सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाही.

सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि हरिद्वार जिल्हा हा राखीव वनक्षेत्र तसेच ‘राजाजी नॅशनल पार्क’च्या सीमेला लागून आहे. त्यामुळे जंगलातील साप, अजगर किंवा इतर सरपटणारे प्राणी मानवी वस्तीत येण्याची शक्यता असते. वनविभागाने यासाठी विशेष पथके तयार केली आहेत. नागरिकांना आवाहन आहे की, परिसरात कोणताही सरपटणारा प्राणी दिसल्यास त्याच्याशी छेडछाड करू नका, त्वरित वनविभागाला सूचित करा, असे आवाहनही शिशपाल सिंग यांनी केले.