जाऊ शब्दांच्या गावा – ‘जेन-झी’ची भाषा आणि मराठी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> साधना गोरे

नुकतंच ‘जंतर मंतर’वर ‘जेन-झी’चं आंदोलन झालं. त्याचे पडसाद इतर राज्यांत, शहरांतही उमटले. ठिकठिकाणी झालेल्या या आंदोलनांत ‘जेन-झी’ची पोलिसांना सामोरं जाण्याची, त्यांना प्रत्युत्तर देण्याची पद्धत, घोषणा अगदी अनोख्या होत्या. मुंबईत आंदोलकांना घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या गाडीसमोरच उभी राहणारी धीट मुलगी असो वा पुण्यात पोलिसांना ‘लव यू’ म्हणणारी किंवा बिहारमध्ये ‘टीअर गॅस की व्यवस्था नहीं क्या?’ असं पोलिसांनाच विचारणारी मुलं असोत; या आणि अशा वेगवेगळ्या पद्धतींनी ‘जेन-झी’ने पोलिसांना सळो की पळो केलं.

या आंदोलनामुळे ‘जेन-झी’चे काही स्लँग अत्यंत चर्चेत आले. जोश, उत्साह किंवा थट्टा करण्यासाठी वापरला जाणारा शब्दप्रयोग म्हणजे ‘वास्ते गुना हुईया’. ‘जेन झी’च्या स्लँगची आणखी काही उदाहरणं म्हणजे, fire (आग) – भारी, sick (आजारी) – जबरदस्त, dead (मृत) – खूप हसू आले, ate (खाल्ले) – अप्रतिम केले, slay (मारणे) – उत्पृष्ट काम करणे, ghost (भूत) – संपर्प तोडणे. ही यादी आणखीही वाढवता येईल, पण इथं सांगायचा मुद्दा म्हणजे ‘जेन-झी’ वापरत असलेली हे सगळे शब्द इंग्रजीतील आहेत. या पिढीच्या वापरात असे मराठी शब्दप्रयोग – ज्याचा अर्थविस्तार किंवा अर्थपरिवर्तन झालं आहे – सहसा दिसत नाहीत. याचं कारण ‘जेन झी’तील अनेक जण इंग्रजी माध्यमात शिकलेले आहेत किंवा त्यांच्यावर इंग्रजी भाषेचा जबरदस्त प्रभाव आहे. दुसरं म्हणजे विविध समाज माध्यमांच्या प्रभावातून असे शब्दप्रयोग जगभरची ‘जेन-झी’ वापरत आहे. या पिढीने असे शब्दप्रयोग मराठी भाषेतही करावेत असं वाटत असेल तर मराठी शाळा टिकायला हव्यात आणि पालकांनी आपल्या मुलांना मराठी माध्यमात शिकवायला हवं.

‘जेन-झी’च्या आधीच्या पिढीने म्हणजे मिलेनियल्सने मराठीतले काही शब्द मूळ अर्थापेक्षा वेगळ्या अर्थाने वापरल्याचं दिसतं. ते शब्द म्हणजे ‘लय’, ‘भारी’, ‘कडक’ इ. पैकी आधीच्या ‘लय भारी’ या लेखात आपण ‘लय’ व ‘भारी’ या शब्दांची माहिती पाहिली होती. फिफा विश्वचषक सुरू असताना फिफाने त्यांच्या समाज माध्यमावर ‘रोनाल्डोचा विषय लय हार्ड हाय’ अशी पोस्ट प्रसारित केल्याचं आपल्याला आठवत असेल.

मराठीत ‘कडक’ शब्द तापट, प्रखर, टणक, तीव्र या अर्थाने वापरला जातो. संस्पृतमधील ‘कक्खट’ शब्दांत अक्षरांत अदलाबदल होऊन आधी तो ‘कटक’ आणि मग ‘कडक’ झाला. संदर्भाने या ‘कडक’च्या अर्थात कसा बदल होतो पहा ः लापूड किंवा माती कडक आहे असे म्हणताना टणक हा अर्थ अभिप्रेत असतो. ‘सरकार कृत्रिम उपायांनी नाणेबाजार कडक राखून ठेवते’ या वाक्यात महाग (भाव, दर) असा अर्थ आहे. ‘त्याचे वडील खूप कडक आहेत’ इथे शिस्तीचे, तापट असा अर्थ आहे. ‘त्यांची मुद्रा बरीच कडक दिसते’ इथे कठोर, उग्र, रागीट असा अर्थ आहे. ‘कडक भाषण’, ‘कडक लेख’ किंवा ‘कडक ऊन’ या उदाहरणांमध्ये प्रखर असा अर्थ आहे. धान्य किंवा भाकरी कडक आहे म्हणजे वाळलेली, आर्द्रता नसलेली. सणसणीत या अर्थानेही ‘कडक’ शब्द वापरला जातो. उदा. ‘अधिकाऱयाने त्याच्याविरुद्ध कडक रिपोर्ट लिहिला.’

लक्ष्मीच्या उग्र स्वरूपाचे सोंग घेऊन भिक्षेकरी स्वतःच्या पाटीवर आसूड ओढतो, त्याला कडकलक्ष्मी म्हटलं जातं. हा भिक्षेकरी पाठीवर आसूड ओढताना ‘कडक’ असा आवाज होतो, शिवाय मळवट भरलेलं त्याचं उग्र रूप यावरून त्याला ‘कडकलक्ष्मी’ म्हटलं गेलं असावं. एखादी स्त्राr रागीट, तापट असेल तर तिलाही ‘कडकलक्ष्मी’ म्हटलं जातं. कडू औषध, तीव्र वासाची तपकीर, विडी, सिगरेट यांनाही ‘कडक’ विशेषण लावलं जातं. निकोप, दणकट माणूस किंवा जनावर यांनाही गावाकडे ‘कडक’ विशेषण लावण्याची पद्धत आहे.

आज मराठीत, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात ‘विषय लय कडक हाय’ऐवजी ‘विषय लय हार्ड हाय’ असं म्हटलं जातं, तेव्हा त्याचे कितीतरी अर्थ होतात. इंग्रजी ‘हार्ड’ शब्दाचे संदर्भानुसार कठीण, कडक, मजबूत, कठोर असे विविध अर्थ होतात, पण ‘विषय लय हार्ड हाय’ हा शब्दप्रयोग एखाद्या व्यक्तीचा दरारा, रुबाब किंवा वेगळेपणा दाखवण्यासाठी, औपरोधिकपणे किंवा खिल्ली उडवण्यासंदर्भात, बिकट किंवा धोकादायक परिस्थितीबद्दल, खूप आवडणाऱया किंवा अप्रतिम गोष्टीसंदर्भात हे वाक्य वापरलं जातं.

याशिवाय तुम्हाला कोणत्या संदर्भात ‘विषय हार्ड’ हा शब्दप्रयोग वापरावासा वाटतो?