अभिमन्यू पवारांच्या मतदारसंघातील शाळांचा असाही ‘लातूर पॅटर्न’, ‘कॉक्रोच’ येणार म्हणून रातोरात शाळेची स्वच्छता; दुसऱ्या शाळेतील विद्यार्थी आणून बसवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘कॉक्रोच’ येणार असल्याचे कळताच भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या औसा मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळेतील कामचुकार शिक्षकांनी रातोरात शाळा रंगवल्या, शिक्षकांनीच झाडू मारला! वर्गात कमी संख्या दिसू नये म्हणून बाहेरच्या शाळेतील विद्यार्थी आणून बसवण्यात आले. शिक्षकांनी शाळेच्या दुर्दैवाचे दशावतार झाकण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण विद्यार्थ्यांनीच हे बिंग फोडले!

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आज औसा, उजनी, एकंबी आणि लातूर येथील सरकारी शाळांची पाहणी केली. दिपके येणार असल्याचे कळाल्यापासूनच औशातील शिक्षकांची पाचावर धारण बसली होती. शिक्षकांनी रातोरात शाळा रंगवल्या. एवढेच नाही तर शिक्षकांनीच वर्ग झाडले, आवारही झाडून स्वच्छ केले. स्वच्छतागृहाचर्चा स्वच्छता मात्र शिक्षक करू शकले नाहीत. अभिजीत दिपके आल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी विद्यार्थ्यांनीच शिक्षकांचे हे बिंग फोडले. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह अशा सुविधा नसल्याचे या पाहणीत दिसून आले. एकाच वर्गात तीन तीन इयत्तांचे विद्यार्थी बसवण्यात येत असल्याचेही समोर आले.

शाळेच्या औसा येथील पटसंख्येवरून अभिजीत दिपके यांनी नाराजी व्यक्त केली. शाळांची अवस्था पाहता निष्क्रिय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. आम्ही येणार असल्याचे कळताच गटविकास अधिकारी गायब झाले. आठ दिवसांत कामचुकार शिक्षक, मुख्याध्यापकावर कडक कारवाई झाली नाही, तर उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला. कॉक्रोच जनता पार्टी शाळांच्या सुधारणेसाठी काम करत आहे. परंतु ज्या गावातील शाळा आहेत तेथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन शाळा सुधारण्यासाठी काम करणे गरजेचे आहे, असे अभिजीत दिपके म्हणाले.

विद्यार्थ्यांचे जेवण अन् पोपटपंची

औसा येथील सरकारी शाळेच्या शिक्षकांनी तर कमालच केली. अभिजीत दिपके शाळेत येण्यापूर्वी विद्यार्थ्यांना जेवायला बसवण्यात आले. जेवणाच्या प्लेटही केटरर्सकडून मागवण्यात आल्या होत्या. ‘दिपके जाईपर्यंत जेवत बसा’ अशी तंबी विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. दिपके यांनी प्रश्न विचारल्यास काय उत्तर द्यायचे हे देखील विद्यार्थ्यांना पढवून ठेवण्यात आले होते. यासंदर्भात दिपके यांनी मुख्याध्यापकांना विचारले असता त्यांनी चक्क कानावर हात ठेवले. त्यामुळे दिपके यांनी गटविकास अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी पंचायत समिती गाठली. परंतु दिपके येणार असल्याचे कळताच गटविकास अधिकारी पळून गेले.