
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना वैद्यकीय तपासणीनंतर इस्लामाबादच्या शिफा इंटरनॅशनल हॉस्पिटलमधून पुन्हा रावळपिंडी येथील अदियाला तुरुंगात आणण्यात आले आहे. जिओ न्यूजने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, कडक सुरक्षा व्यवस्थेत त्यांना रुग्णालयातून थेट त्यांच्या तुरुंगातील कोठडीत हलवण्यात आले.
मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास प्रकृती बिघडल्याने इम्रान खान यांना नियमित वैद्यकीय तपासणीसाठी अदियाला तुरुंगातून शिफा रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथे सहा तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी केली. इम्रान खान यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे की नाही, हे या तपासणीनंतरच निश्चित केले जाणार होते. अखेर सर्व वैद्यकीय चाचण्या आणि चौकशी पूर्ण झाल्यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्यात आले. या संपूर्ण घडामोडीदरम्यान एक महत्त्वाची कायदेशीर घडामोड समोर आली आहे. इम्रान खान यांना रुग्णालयात हलवण्याच्या निर्णयाविरोधात सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार कार्यालयाने काही तांत्रिक आक्षेप नोंदवत सरकारची ही याचिका फेटाळली. आता सरकार या आक्षेपांचे निराकरण करून ही याचिका पुन्हा दाखल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दुसऱ्या बाजूला राजकीय वर्तुळातही हालचाली वाढल्या आहेत. इम्रान खान यांना उपचारासाठी किंवा अन्य कारणास्तव परदेशात पाठवण्याच्या शक्यतेवर विचार केला जाऊ शकतो, असे संकेत केंद्रीय मंत्री तारिक फजल चौधरी यांनी दिले आहेत. तरी या संदर्भात अद्याप कोणताही अधिकृत किंवा अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. इम्रान खान यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना रुग्णालयात नेण्यापासून ते पुन्हा कोठडीत आणेपर्यंत मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दल तैनात करण्यात आले होते.




























































