
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढल्यामुळे विविध आरोग्य समस्या डोके वर काढतात. सर्दी, खोकला आणि व्हायरल संसर्गासोबतच या काळात कानाच्या समस्याही वाढू शकतात. कानात दुखणे, खाज येणे, पाणी किंवा द्रव बाहेर येणे तसेच ऐकू कमी येणे अशी लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.
पावसाचे पाणी, घाण पाणी किंवा कानामध्ये बराच वेळ ओलावा राहिल्यास बॅक्टेरिया आणि बुरशीची वाढ होण्याची शक्यता असते. त्यामुळे कानाच्या संसर्गाचा धोका वाढतो.
तज्ज्ञांच्या मते, कानाचा आतील भाग अतिशय संवेदनशील असतो. कानात गेलेले पाणी बराच वेळ बाहेर न पडल्यास संसर्ग होण्याची शक्यता वाढते. पावसात भिजणे, पोहणे तसेच ओले ईअरफोन किंवा ईअरबड वापरणे यामुळेही समस्या निर्माण होऊ शकते.
काही व्यक्तींमध्ये आधीपासून असलेली अॅलर्जी, सायनसची समस्या किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यास संसर्गाचा धोका अधिक असू शकतो.
कानात सतत दुखणे किंवा खाज येणे, कानातून पाणी किंवा पिवळसर द्रव बाहेर येणे, कान बंद झाल्यासारखे वाटणे, ऐकण्याची क्षमता कमी होणे किंवा कानाच्या आतील भागात सूज येणे ही संसर्गाची संभाव्य लक्षणे आहेत. मुलांमध्ये चिडचिड वाढणे किंवा वारंवार कानाला हात लावणे हेही लक्षण असू शकते.
ही लक्षणे दोन-तीन दिवसांपेक्षा जास्त काळ कायम राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
कान दुखत असल्यास प्रत्येक वेळी संसर्ग झाला असेलच असे नाही. कानात साचलेला मळ, घशाचा संसर्ग, सायनसची समस्या किंवा जबड्याशी संबंधित कारणांमुळेही कान दुखू शकतो. त्यामुळे स्वतःहून औषधे घेण्याऐवजी योग्य तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे.
पावसात भिजल्यानंतर कान व्यवस्थित कोरडे करावेत. पोहल्यानंतर कानात पाणी राहणार नाही याची काळजी घ्यावी. अस्वच्छ ईअरफोन किंवा ईअरबड वापरू नयेत.
कानात माचिसची काडी, पिन किंवा कोणतीही टोकदार वस्तू घालू नये. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कानात ईअर ड्रॉप, तेल किंवा कोणतेही घरगुती द्रव टाकणे टाळावे. कानाची स्वच्छता करतानाही अतिरेक करू नये.





























































