
दिल्लीमध्ये महिला प्रीमियर लीगचा थरार सध्या सुरू आहे. याच थरारा दरम्यान सोशल मीडियवर एक महिला खेळाडू व्हायरल झाली आहे. इंटरनेटवर तिच्या अनोख्या 6-7 सेलीब्रेशनची जोरदार चर्चा होतेय. दिल्ली सेंट्रल किंग्सकडून ती खेळत असून दिल्ली सुपरस्टार्सविरुद्धच्या सामन्यात तीने दमदार कामगिरी केली. तिने गोलंदाजी करताना 16 व्या षटकात निशिका सिंहला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवलं आणि आपल्या अनोख्या सेलिब्रेशनने सामन्याचे मुख्य आकर्षण ठरली. 20 वर्षांच्या अष्टपैलू मेधावी बिधूडीचा हा सेलीब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
सामन्यानंतर माध्यमांशी बोलताना मेधावीने तिच्या या अनोख्या सेलिब्रेशनचा खुलासा केला. तिने सांगितले की, “हे ‘6-7’ सेलिब्रेशन आहे, ज्याचा सध्या ट्रेंड सुरू आहे. माझी लहान बहीण Gen-Z जनरेशनची आहे, तिनेच मला माझी जर्सी नंबर 67 ठेवायला आणि हेच सेलिब्रेशन करण्याचा सल्ला दिला होता.” मेधावीने पुढे स्पष्ट केले की, ती गोलंदाजी करताना विकेट्ससाठी प्रयत्न न करता जास्तीत जास्त डॉट बॉल्स टाकण्यावर आणि धावा रोखण्यावर भर देत होती.
View this post on Instagram
दिल्ली महिला संघाकडून दीर्घकाळापासून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या मेधावीने पहिल्या सामन्यातील अनुभवाबद्दल बोलताना सांगितले की, या सामन्यातून संघाने बऱ्याच गोष्टी शिकल्या आहेत. आगामी सामन्यांमध्ये संघाची रणनीती स्पष्ट करताना तिने आशा व्यक्त केली की, तिची टीम अधिक आत्मविश्वासाने मैदानात उतरेल आणि फलंदाजीमध्येही आपली सर्वोत्तम कामगिरी करून दाखवेल.


























































