
तमिळनाडू विधानसभेत शुक्रवारी सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून जोरदार खडाजंगी झाली. विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांनी मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांना त्यांच्या टेबलवर असलेल्या भ्रष्टाचाराच्या तीन फाईल्स उघडून त्यावर कारवाई करण्याचे आव्हान दिले.
विधानसभेत चर्चेला सुरुवात करताना उदयनिधी यांनी मुख्यमंत्री विजय यांनी तीन फाईल्सचा उल्लेख केला होता, याची आठवण करून दिली. या फाईल्स योग्य वेळी उघडण्याची वाट पाहत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. यावर उदयनिधी म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांनी आमच्या पूर्वीच्या द्रमुक सरकारवर आरोप केले आहेत आणि हे तपशील जाहीर करण्यास भाग पाडू नका, असे म्हटले आहे. मी त्यांना आग्रह करतो की, त्यांनी त्या फाईल्स उघडाव्यात आणि कारवाई करावी. त्या उघडण्यास भीती का वाटते आणि विलंब का केला जात आहे?” असा सवाल उदयनिधी यांनी उपस्थित केला.
उदयनिधी यांच्या या वक्तव्यावर विधानसभा अध्यक्ष जे. सी. प्रभाकर यांनी आक्षेप घेतला आणि त्यातील एक टिप्पणी सभागृहाच्या अधिकृत कामकाजातून काढून टाकली.
यावेळी मंत्री एन. आनंद यांनी सरकारकडे या तीन फाईल्ससंदर्भात पूर्ण पुरावे असल्याचे सांगितले. योग्य वेळी त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी सभागृहाला दिली.
दरम्यान, मुख्यमंत्री विजय निर्णय घेण्यासाठी इतरांवर अवलंबून असल्याचा उदयनिधी यांचा आरोपही अध्यक्ष प्रभाकर यांनी फेटाळला. मुख्यमंत्री स्वतंत्र विचार, बुद्धिमत्ता आणि प्रशासकीय क्षमतेच्या आधारे निर्णय घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विभागीय अधिकाऱ्यांशी ठरावीक आणि औपचारिक पद्धतीने चर्चा केल्यानंतर निर्णय घेतले जातात, त्यावर बाहेरील व्यक्तींचा प्रभाव नसतो, असे अध्यक्षांनी सांगितले.
सभागृहातील चर्चेदरम्यान ‘पंच डायलॉग’ किंवा सिनेमातील संवादासारखी भाषा वापरू नये, असे आवाहनही अध्यक्षांनी केले. योग्य कागदपत्रे किंवा पुरावे नसताना प्रक्षोभक अथवा अप्रमाणित आरोप सभागृहात करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘योग्य वेळी फाईल्स उघडणार’
उदयनिधी यांच्या आक्रमक भूमिकेची पार्श्वभूमी मुख्यमंत्री विजय यांनी 19 ऑगस्ट रोजी विधानसभेत केलेल्या वक्तव्याची आहे. मागील द्रमुक सरकारच्या कथित भ्रष्टाचाराचे पुरावे मागत राहिल्यास ते फाईल्स उघडतील, असा इशारा विजय यांनी विरोधकांना दिला होता.
विजय यांनी सांगितले होते की, तीन सरकारी विभागांशी संबंधित ‘गंभीर पुरावे असलेल्या फाईल्स’ त्यांच्या टेबलवर आहेत. या फाईल्सचा आढावा घेण्यात आला असून त्यामध्ये पुरावे आहेत. विरोधकांनी पुरावे मागत राहू नयेत, अन्यथा योग्य वेळी ते सर्व तपशील जाहीर करतील, असा इशारा त्यांनी दिला होता.



























































