एसटीच्या गट आरक्षणावरील 30 टक्क्यांची भाडेवाढ रद्द; कोकणवासीयांच्या तीव्र विरोधानंतर महायुती सरकारची माघार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर आधी 13.5 टक्क्यांची कायमस्वरुपी भाडेवाढ लादून नंतर गट आरक्षणाच्या 30 टक्क्यांच्या भाडेवाढीचा भार लादणाऱ्या महायुती सरकारने कोकणवासीयांच्या तीव्र विरोधानंतर गट आरक्षणावरील 30 टक्क्यांची भाडेवाढ रद्द केली. एसटीच्या एकेरी गट आरक्षणावर आकारण्यात येणारे 30 टक्के अतिरिक्त शुल्क रद्द करण्यात येत असल्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी जाहीर केले.

यंदा एसटी महामंडळाचा वाढता तोटा कमी करण्यासाठी एकेरी गट आरक्षणावर 30 टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या निर्णयामुळे अनेक कोकणवासीय तसेच गणेशभक्त मंडळांनी विरोध करत अतिरिक्त शुल्क रद्द करण्याची मागणी केली होती. कोकणवासीयांच्या विरोधानंतर सरकारने अतिरिक्त शुल्क रद्द करण्याचे निर्देश दिले.

दरवर्षी गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर येथून सुमारे 5 हजारांहून अधिक बसेस एसटी महामंडळाकडून उपलब्ध करून दिल्या जातात. या विशेष वाहतुकीसाठी राज्यातील इतर विभागांतून दोन-तीन दिवस आधी बसेस मागविल्या जातात. कोकणात प्रवाशांना सोडल्यानंतर या बसेस रिकाम्या परत आणाव्या लागतात. त्यामुळे एसटी महामंडळावर इंधनाचा खर्च तसेच चालक-वाहकांच्या अतिकालीन भत्त्याचा अतिरिक्त भार पडतो. त्यातच डिझेलच्या किमती आणि कर्मचाऱ्यांच्या अतिकालीन भत्त्यात वाढ झाल्याने एसटीच्या तोट्यात मोठी वाढ होत आहे. या सर्व बाबींचा विचार करून एसटी महामंडळाने यंदापासून एकेरी गट आरक्षणावर 30 टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कोकणवासीयांचा विरोध लक्षात घेऊन हे शुल्क आता रद्द करण्यात येत आहे.