
क्रिकेट विश्वात मागील काही वर्षांमध्ये महिला क्रिकेटचा बोलबाला पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धा असो अथवा विविध देशांमध्ये होणाऱ्या WPL सारख्या प्रीमियर लीग. पुरुषांच्या क्रिकेटप्रमाणे महिलांच्या क्रिकेटचा चाहतावर्गही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. असे असताना इंग्लंड महिला क्रिकेट संघाची वेगवान गोलंदाज केट क्रॉस हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. चालू हंगाम हा तिच्या व्यावसायिक कारकिर्दीचा शेवटचा हंगाम असल्याची माहिती तिने सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे.
केट क्रॉसने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या निवृत्तीची घोषणा केली. ती म्हणाली की, “ज्या खेळाने मला जीवनभर साथ दिली आणि मला आजची व्यक्ती बनवलं, त्याला निरोप देणं अत्यंत कठीण आहे, पण आता या प्रवासाचा अंतिम टप्पा आला आहे.” सर्वोच्च स्तरावर व्यावसायिक क्रिकेट खेळायला मिळाल्याबद्दल तिने स्वतःला अतिशय भाग्यवान मानले असून यादरम्यान भेटलेली माणसे आणि आयुष्यभर सोबत राहणाऱ्या सुंदर आठवणींसाठी तिने सर्वांचे आभार मानले आहेत.
View this post on Instagram
केट क्रॉसचा हा 12 वर्षांचा आंतरराष्ट्रीय प्रवास 2013 ते 2025 या काळात गाजला. तिने आपल्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये 102 आंतरराष्ट्रीय सामने खेळले, ज्यामध्ये 8 कसोटी, 76 एकदिवसीय आणि 78 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळत एकूण १४० बळी टिपले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटशिवाय ती महिला प्रीमियर लीगमध्ये (डब्ल्यूपीएल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाचा भाग राहिली आहे, तसेच तिने ‘द हंड्रेड’ आणि महिला बिग बॅश लीग (डब्ल्युबीबीएल) सारख्या प्रतिष्ठित T20 लीगमध्येही दमदार कामगिरी केली आहे.




























































