दिल्लीतील करोल बाग परिसरात इमारतीचा काही भाग कोसळला; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीच्या करोल बाग परिसरात एका इमारतीचा काही भाग कोसळला. प्यारेलाल रोडवरील एका सराफाच्या दुकानाजवळ एका जुन्या इमारतीचा काही भाग अचानक कोसळला. ही घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. इमारतीत दुरुस्ती आणि पाडकामाचे काम सुरू होते. या अपघातात ढिगाऱ्याखाली तीन जण अडकले, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. इतर दोघे गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन आणि पोलिसांची पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. मदत आणि बचाव कार्य त्वरित सुरू करण्यात आले.दिल्ली अग्निशमन सेवेचे विभागीय अधिकारी गोपाल मीना यांनी या घटनेची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, त्यांना प्यारेलाल रोडवर अपघात झाल्याचा फोन आला. घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांना समजले की, स्थानिक रहिवासी आणि बचाव पथकांच्या मदतीने दोन-तीन जखमींना ढिगाऱ्याखालून आधीच बाहेर काढून जीवनमाला रुग्णालयात पाठवण्यात आले होते.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, ज्या इमारतीत अपघात झाला ती खूप जुनी आणि मोडकळीस आलेली होती. इमारतीची अवस्था आधीच खराब होती. अपघात झाला तेव्हा दुरुस्तीचे काम सुरू होते. अपघाताचे खरे कारण शोधण्यासाठी पोलीस आणि प्रशासन या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.