म्यानमारमधील बौद्ध मठावर ध्यान शिबिरादरम्यान हवाई हल्ला; 14 जणांचा मृत्यू, 20 जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

म्यानमारच्या सागाइंग भागात शुक्रवारी लष्कराने एका बौद्ध मठावर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात ध्यान शिबिरात सहभागी झालेल्या 14 जणांचा मृत्यू झाला. हल्ल्यात अन्य 20 जण जखमी झाले आहेत. म्यानमारमधील दुसरे सर्वात मोठे शहर असलेल्या मंडालेच्या पश्चिमेस सुमारे 75 किलोमीटर अंतरावर असलेल्या म्याउंग टाउनशिपमधील ‘स्वेले ओ’ गावात सकाळी शुक्रवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला.

इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, लोक ध्यान शिबिरात सहभागी झालेले असतानाच एका लढाऊ विमानाने गावातील मठाच्या आवारात बॉम्ब टाकला. या हल्ल्यात तीन महिलांसह 14 जणांचा मृत्यू झाला, तर अन्य 20 जण जखमी झाले. मृतांची ओळख आणि जखमींची प्रकृती याबाबतची माहिती तात्काळ उपलब्ध होऊ शकली नाही.

म्यानमारमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला आहे. म्यानमारमध्ये लष्कर, लोकशाहीवादी शक्ती आणि वांशिक सशस्त्र गट यांच्यात सशस्त्र संघर्ष सुरू आहे. येथे लष्कराकडून लोकशाहीवादी सशस्त्र गट आणि वांशिक सशस्त्र संघटनांविरुद्ध वारंवार हवाई शक्तीचा वापर केला जात आहे. म्यानमारचे लष्कर आणि लष्करी राजवटीला विरोध करणाऱ्या सैन्य यांच्यातील संघर्षाचा फटका बसलेल्या क्षेत्रांपैकी सागाइंग हा एक भाग राहिला आहे.