आत्महत्या करणाऱ्या मुलाला वाचवताना बाप-लेक डोंगरावरून कोसळले; नवरा, मुलगा पडल्याचे पाहून आईनेही उडी मारली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुलगा रुसला, आत्महत्या करतो म्हणाला. आई-वडिलांनी जीव काकुळतीला आणून मुलाची विनवणी केली. डोंगराच्या काठावर उभ्या असलेल्या मुलाला वाचवण्यासाठी शेवटी बापाने धाडस करून त्याच्यावर झडप घातली. एकमेकांना वाचवण्याच्या झटापटीत दोघेही खाली कोसळले. नवरा आणि मुलगा कोसळल्याचे पाहून पाठोपाठ आईनेही डोंगरावरून उडी घेतली. अवघ्या तीन सेकंदात तिघांचाही मृत्यू झाला. अग्निशामक दल, पोलीस तसेच स्थानिक ग्रामस्थांचे या तिघांना वाचवण्याचे प्रयत्न अपयशी ठरले.

जालना जिल्ह्यातील कर्जत पिंपळगाव येथील मुरलीधर दामोधर चांदगुडे (48) हे पत्नी संगीता (42) आणि मुलगा कुणाल (19) यांचा मृत्यू झाला.

आयफोनसाठी रुसला

कुणाल हा हुशार विद्यार्थी होता. दहावीला त्याला 92 टक्के गुण मिळाले होते. सध्या तो ‘नीट’ची तयारी करत होता. आयफोनसाठी रुसून तो मागे याच खवड्या डोंगरावर आला होता. त्यावेळी परिसरातील नागरिकांनी पकडून त्याला पोलिसांच्या हवाली केले होते. आज सकाळीही तो रागाच्या भरात घराबाहेर पडल्यानंतर खवड्या डोंगरावरच गेला असावा, असा अंदाज बांधून त्याचे आई-वडील, मावशी त्याला शोधत डोंगरावर आले होते.