Chandrapur News – ग्रामसभेच्या मागणीवरून महिला आक्रमक; थेट ग्रामपंचायतीच्या छतावर चढून आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील आटमुर्डी येथे ग्रामसभा रद्द केल्याच्या कारणावरून महिला आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. गावात आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी उपस्थित राहणे अपेक्षित असलेल्या महिला सरपंच वैशाली दरेकर या अनुपस्थित राहिल्या. यामुळे प्रशासनाकडून ही ग्रामसभा रद्द करण्यात आली. सरपंच उपस्थित न राहिल्याने संतप्त झालेल्या महिलांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयाच्या छतावर चढून आंदोलन सुरू केले, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

ग्रामसभेत विविध मुद्द्यांवर चर्चा होणे अपेक्षित असताना ती अचानक रद्द झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. जोपर्यंत प्रत्यक्ष ग्रामसभा घेतली जात नाही, तोपर्यंत छतावरून खाली उतरणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलक महिलांनी घेतली आहे. या आंदोलनामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन काय भूमिका घेते आणि ग्रामसभा पुन्हा कधी आयोजित केली जाते, याकडे आता संपूर्ण आटमुर्डी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.