
दिल्लीत जंतरमंतरवर कॉक्रोच जनता पार्टीने नीट पेपरफुटीविरोधात मोठे आंदोलन केले. त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मोदी सरकारला विद्यार्थ्यांसमोर झुकावे लागले. सीजेपीच्या या आंदोलनाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील गांभीर्याने घेतले आहे. सरकारी यंत्रणांमध्ये त्रुटी आहेत. या संस्थांच्या अपयशामुळेच ‘जंतरमंतर’ घडले. यासंदर्भात संघाने मोदी सरकारला कानपिचक्या देत आवश्यक पावले उचलण्याचा सल्लाही दिला आहे.
संघाची विशाखपट्टणम येथे अखिल भारतीय समन्वय बैठक सुरू आहे. त्यात जंतरमंतर येथील आंदोलनरवर सखोल मंथन करण्यात आले. संघाचे सरकार्यवाह सी. आर. मुकुंद यांनी बैठकीत मार्गदर्शन करताना सांगितले, की राष्ट्रीय आणि राज्य सरकारच्या संस्थांमध्ये काही उणीवा आहेत. त्यामुळे तरुणांमध्ये असंतोष आहे. त्यांना त्यांच्या भवितव्याची चिंता वाटते. यावर तोडगा निघायला हवा. मात्र, आंदोलनाच्या नावाखाली हिंसाचार नको. सकारात्मक दृष्टिकोनातूनच समस्येवर तोडगा निघेल. त्यासाठी सरकार आणि समाज एकत्र येणे आवश्यक असून यंत्रणेतील त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न करायला हवे, असे मुकुंद म्हणाले.
काही समुदायांच्या लोकसंख्येत वेगाने वाढ
हिंदुस्थान लोकसंख्या असंतुलनाचा सामना करत आहे. त्याशिवाय काही समुदायांची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. काही समुदायांची कमी होत आहे, याकडे मुपुंद यांनी बैठकीत लक्ष वेधले. तसेच देशातील युवकांवर नशेचा प्रभाव वाढतोय यावर देखील बैठकीत चर्चा झाली. तसेच ‘एआय’वरदेखील बैठकीत मंथन करण्यात आले.

























































