
गणेशभक्तांसाठी खूशखबर आहे. गणेशोत्सवाच्या काळात गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशदर्शनासाठी लाखोंच्या संख्येने मुंबईत येणाऱया गणेशभक्तांच्या सोयीसाठी मेट्रोच्या फेऱया रात्री उशिरापर्यंत वाढवण्यात येणार आहेत. याशिवाय गणपतीच्या काळात लोकलचा मेगाब्लॉकही घेतला जाणार नाही. तसे निर्देश राज्य शासनाने मेट्रो आणि रेल्वे प्रशासनाला दिले आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात मुंबई आणि उपनगरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होते. त्यांचा प्रवास सुरक्षित व अडथळामुक्त व्हावा यासाठी मेट्रोच्या फेऱया वाढवण्यात याव्यात तसेच मेगाब्लॉक घेतला जाऊ नये अशी मागणी नागरिक आणि गणेश मंडळांकडून करण्यात आली होती. त्यानुसार पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी संबंधित प्रशासनांना निर्देश दिले आहेत.
भाविकांना तिकीट काढताना अडचणी येऊ नयेत यासाठी मेट्रोवरील सर्व तिकीट काऊंटर, ऑटोमेटिक तिकीट व्हेंडिंग मशीन्स (एटीव्हीएम), डिजिटल तसेच क्यूआर तिकीट प्रणाली मेट्रोची शेवटची फेरी होईपर्यंत पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मेट्रो स्थानकांवरील लिफ्ट, एस्केलेटर, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि प्राथमिक उपचार केंद्रे सेवा सुरू असेपर्यंत उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

























































