
गेल्या १३ वर्षांपासून नेमबाज घडवून त्यांना ऑलिम्पिकपर्यंत पोहोचवणाऱ्या प्रशिक्षिका नेहा चव्हाण यांचे नाव ‘द्रोणाचार्य पुरस्कारा’साठी जाहीर झाले आणि महाराष्ट्राला सुखद धक्का बसला. “महाराष्ट्रात गुणवत्तेची कमतरता नाही. एकामागून एक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर तिरंगा फडकवत आहेत, त्यामुळे नेमबाजीमध्ये महाराष्ट्राचे भविष्य उज्ज्वल आहे,” अशी भावना नेहा चव्हाण यांनी व्यक्त केली. तसेच, या पुरस्कारामुळे पुढच्या पिढीला तयार करण्याची जबाबदारी अधिक वाढल्याचेही त्यांनी नमूद केले.
मुंबईतून केला नेमबाजीचा श्रीगणेशा
आपल्या नेमबाजीच्या प्रवासाबद्दल नेहा म्हणाल्या, “दहिसरच्या शैलेंद्र एज्युकेशन शाळेत आठवीत असताना माझ्या नेमबाजीची सुरुवात झाली. शालेय, विद्यापीठ आणि राज्यस्तरीय स्पर्धा गाजवल्यानंतर मी राष्ट्रीय स्पर्धांपर्यंत पोहोचले. कुरुक्षेत्र येथे झालेल्या स्पर्धेत ४०० पैकी ३९७ गुण मिळवत मी राष्ट्रीय विक्रम नोंदवला. पुढील ७-८ वर्षे मी देशाकडून खेळत राहिले, पण नंतर नोकरीचा प्रश्न समोर आला आणि मी त्या दृष्टीने विचार करू लागले.”
…आणि अशी मी प्रशिक्षणाकडे वळले
खेळाडू प्रशिक्षणाकडे कसा वळतो, याबद्दल सांगताना त्या म्हणाल्या, “मी २५ वर्षांची होईपर्यंत खेळत होते. पण त्यानंतर स्वतःच्या पायावर उभे राहणे महत्त्वाचे होते आणि मी नोकरी शोधत होते. नेमका त्याच वेळी भारताचे दिग्गज नेमबाज गगन नारंग ‘टॅलेंट सर्च’ मोहीम राबवत होते आणि सरकारनेही त्यांना पाठिंबा दिला होता. त्यातून ‘गन फॉर ग्लोरी’ संस्था सुरू झाली. त्यांना गुणवंत शोधण्यासाठी अनुभवी व्यक्तींची गरज होती आणि मला नेमबाजीचा अनुभव असल्याने मी प्रशिक्षणाकडे वळले.”
तळागाळातून घडले आंतरराष्ट्रीय खेळाडू
खेळाडू घडवण्याच्या अनुभवाबद्दल नेहा म्हणाल्या, “मी सुरुवातीला अहमदाबाद येथे तीन वर्षे प्रशिक्षण दिले. तेथे दोनदा ऑलिम्पिक खेळलेली इलावेनिल वालारिवन हिच्यासारखी खेळाडू घडवता आली. आशियाई स्पर्धेतील पदक विजेता केवल प्रजापती आणि अर्जुन पुरस्कार विजेता धनुष श्रीकांत हे खेळाडूही तेथेच घडले. धनुषला ऐकू येत नसल्याने वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून आम्ही त्याला शिकवले. आता असे अनेक खेळाडू घडत आहेत, जे देशासाठी उत्तम आहे.”
महाराष्ट्रातील युवा खेळाडूंवर विश्वास
महाराष्ट्राच्या भविष्याबाबत नेहा यांनी सांगितले, “अंजली भागवत, सुमा शिरूर, दीपाली देशपांडे यांना पाहून आम्ही खेळायला लागलो. आता स्वप्निल कुसाळे, रुद्रांश पाटील यांच्यासारख्या खेळाडूंनी जग गाजवले आहे. पार्थ माने, सोनल म्हसकर हे खेळाडू जागतिक क्षितिजावर आपले नाव अधोरेखित करत आहेत. महाराष्ट्रातून अनेक खेळाडू पुढे येत असून आपल्या राज्याचे भवितव्य सुरक्षित आहे.”
नेमबाजी आता सर्वसामान्यांचा खेळ
खेळातील खर्चाबाबत त्या म्हणाल्या, “२०-२५ वर्षांपूर्वीची परिस्थिती आता राहिलेली नाही. आमच्या संस्थेत आल्यावर पहिले एक वर्ष सर्व गोष्टी पुरवल्या जातात. देशात आता अनेक संस्था पुढे आल्या असून शिष्यवृत्तीही दिल्या जातात. त्यामुळे आता महागड्या बंदुका किंवा गोळ्या विकत घ्याव्याच लागतात असे नाही. सर्वसामान्य घरातील मुलेही आता या खेळाकडे वळत आहेत.”
आता ध्येय जागतिक स्पर्धा!
आगामी लक्ष्याबाबत बोलताना नेहा यांनी सांगितले, “आशियाई स्पर्धा काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे जागतिक अजिंक्यपद स्पर्धा सुरू होत आहेत आणि या स्पर्धांमध्ये देशाचा तिरंगा फडकवणे हेच आमचे ध्येय असेल.”


























































