उद्योग बंद पडत असताना मुख्यमंत्री, उद्योगमंत्री मस्तीत – विनायक राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्राची अवस्था अतिशय बिकट आहे. उद्योग-व्यवसाय बंद पडत आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांत ३६ हजार उद्योग बंद पडले. हे महाराष्ट्राला भूषणावह नसून, लाजीरवाणी गोष्ट आहे. असे असतानाही राज्याचे मुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांसह महायुतीतील सत्ताधारी स्वतःच्या मर्जीमध्ये आणि मस्तीमध्ये वावरत आहेत, अशी टीका शिवसेना सचिव, माजी खासदार विनायक राऊत यांनी केली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दहा व्यक्तींचा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत आणि सचिव विनायक राऊत यांच्या हस्ते ‘उद्धव श्री पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी विनायक राऊत बोलत होते. पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख चेतन पवार, जिल्हाप्रमुख प्रकाश भेगडे, पिंपरी-चिंचवड संपर्कप्रमुख लतिका पाष्टे, विजय सुळे, सहसंपर्कप्रमुख, अॅड. गौतम चाबुकस्वार, मावळ तालुकाप्रमुख आशीष ठोंबरे, सहसंपर्कप्रमुख गजानन थरकुडे, जिल्हा उपप्रमुख रोमी संधू, तुषार नवले, महिला संघटिका अनिता तुतारे, सुशिला पवार आदी उपस्थित होते.

संयोजक, शहरप्रमुख चेतन पवार म्हणाले, विविध क्षेत्रांत पारंगत असणाऱ्या व्यक्तींना प्रेरणा मिळावी, याकरिता शिवसेना परिवारातर्फे त्यांचा गौरव केला जात आहे. पुरस्कारार्थीतर्फे डॉ. संजीवकुमार पाटील, काशिनाथ नखाते, डॉ. रोहन काटे यांनी मनोगत व्यक्त केले.

‘उद्धव श्री २०२६’ पुरस्काराचे सन्मानार्थी

डॉ. संतोष लाटकर (वैद्यकीय), डॉ. रोहन काटे (वैद्यकीय), प्रा. तुकाराम पाटील (साहित्यिक), काशिनाथ नखाते (कामगार), प्रीती वैद्य (सामाजिक), चांद पाशा अहमद हुसेन तांबोळी (क्रीडा), पै. योगेश्वर तापकीर (क्रीडा), भाग्यश्री मोरे (सामाजिक), रामदास काटे (कृषी) आणि डॉ. संजीव कुमार पाटील (कला) यांचा ‘उद्धव श्री पुरस्कार २०२६’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला.