
समाजाप्रती आपले दायित्व म्हणून मोठय़ा पंपन्यांकडून विविध सामाजिक उपक्रमांसाठी निधी दिला जातो. त्या कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (सीएसआर) निधीच्या वापरावर आता राज्य शासनाचा वॉच राहणार आहे. या निधीचा योग्य वापर होतोय की नाही यावर नजर ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महासीएसआर प्राधिकरण स्थापन केले जाणार आहे. या प्राधिकरणाच्या माध्यमातून सीएसआर निधीचे समन्वयन, निरीक्षण आणि योग्य वापर सुनिश्चित करण्यावर भर दिला जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे यासंदर्भात बैठक झाली. सीएसआर निधीचा अधिक प्रभावी, पारदर्शक आणि समन्वयित वापर करण्यासाठी ‘महासीएसआर प्राधिकरण’ स्थापन करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. शासनाच्या प्राधान्याच्या प्रकल्पांना सीएसआरचे आर्थिक पाठबळ लाभावे हासुद्धा प्राधिकरणामागचा उद्देश आहे.

























































