
कोस्टल रोड प्रकल्पालगत प्रस्तावित असलेल्या सुमारे 300 एकर क्षेत्रावरील लँडस्केप गार्डनपर्यंत पोहोचता यावे यासाठी वरळी नेहरू सेंटर विज्ञान केंद्र मेट्रो स्थानक ते वरळी प्रॉमेनेड व लँडस्केप गार्डनला जोडणारा भूमिगत पादचारी मार्ग बांधण्यासाठी मुंबई महानगरपालिका मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला तब्बल 702 कोटी 44 लाख 35 हजार रुपये देणार आहे. या मार्गाचे श्रेय ‘एमएमआरसीएल’ घेणार असताना पालिका खर्च का देते, असा सवाल शिवसेनेसह विरोधकांनी स्थायी समितीत उपस्थित केला.
स्थायी समितीत मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला काँग्रेसचे गटनेते अश्रफ आझमी यांनी उपसूचना मांडत प्रस्ताव ‘रेफर बॅक’ करण्याची मागणी केली. याला पाठिंबा देत शिवसेनेचे यशोधर फणसे, श्रद्धा जाधव यांच्यासह ‘मनसे’चे यशवंत किल्लेदार, जमीर कुरेशी, तुलीप मिरंडा, अजंता यादव यांनी पालिकेकडून केल्या जाणाऱया खर्चाला विरोध करण्यात आला. एकीकडे पालिकेकडून पैसे वाचवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्याचे सांगितले जात असताना ‘एमएमआरसीएल’ बांधणाऱया प्रकल्पाला पालिका इतके पैसे का देते, असा सवाल उपस्थित करण्यात आला.
भूमिगत मार्ग वरळी, महालक्ष्मी स्थानकाला जोडा
हा भूमिगत मार्ग वरळी आणि महालक्ष्मी रेल्वे स्टेशनला जोडण्याची मागणी शिवसेनेचे यशोधर फणसे यांनी केली. तर प्रकल्पाचा खर्च ‘एमएमआरसीएल’नेच करावा, असे श्रद्धा जाधव म्हणाल्या. यावेळी ‘रेफर बॅक’ उपसूचनेला भाजपचे मकरंद नार्वेकर यांनी विरोध करीत मूळ प्रस्ताव मंजुरीला पाठिंबा दिला. याला सत्ताधारी नगरसेवकांनी पाठिंबा दिला. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी उपसूचना बहुमताने फेटाळत मूळ प्रस्तावही बहुमताने मंजूर केला.

























































