सरकार झुकले… साडेसात तासांच्या ठिय्या आंदोलनानंतर पेलेट गनप्रकरणी गुन्हा दाखल; राहुल गांधी यांचा तडाखा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील संसद मार्ग पोलीस ठाण्यात सुमारे साडेसात तास ठिय्या आंदोलन केले. त्यांच्या आंदोलनाच्या तडाख्याने अखेर सरकार झुकले आणि जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांवर पेलेट गनमधून झालेल्या गोळीबार प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. त्याच वेळी राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जबर हल्ला चढवला. तुम्ही एवढे का घाबरता? ही भीतीच दाखवते की तुम्हाला तुमचा गुन्हा मान्य आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

जंतरमंतरवर 20 जुलै रोजी विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला करण्यात आला. तसेच पेलेट गनचादेखील विद्यार्थ्यांवर वापर करण्यात आला. पेलेट गनचे छर्रे लागल्यामुळे साहिल नावाचा तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्या डोळय़ांमध्ये छर्रे रुतून बसले आहेत. त्यामुळे त्याच्या एका डोळय़ाची दृष्टी जवळपास गेली आहे. राहुल गांधी आज साहिल या जखमी विद्यार्थ्याला घेऊन पोलीस ठाण्यात धडकले. साहिलने 14 ऑगस्ट रोजी पेलेट गनप्रकरणी कनॉट प्लेस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सुरक्षा दलांनी 19 वर्षीय साहिलवर पेलेट गनने पाच ते सहा वेळा गोळीबार केला. परिणामी, त्याच्या उजव्या डोळय़ाची दृष्टी एक टक्क्यापेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे, असे डॉक्टरांनीच नमूद केले आहे. साहिलच्या शरीरात 200 पेक्षा जास्त छर्रे रुतलेले आहेत. ते मज्जातंतूजवळ असल्यामुळे बाहेरदेखील काढणे अशक्य आहे. पोलिसांनी ही तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला. राहुल गांधी त्यानंतर आज संसद मार्ग पोलीस ठाण्यात साडेसात तास ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत एफआयआर दाखल होत नाही तोपर्यंत येथून हटणार नाही. एफआयआर नोंदवा आणि तपास अधिकाऱ्याचे नाव सांगा. त्यानंतर आम्ही निघून जाऊ, अशी ठाम भूमिका राहुल गांधी यांनी घेतली. अखेर दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर दाखल केला. या एफआयआरनुसार, बीएनएसच्या कलम 118 आणि 125 अन्वये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी, जयराम रमेश, अधीर रंजन चौधरी आदी नेते उपस्थित होते.

गुन्हे दाखल करण्यापासून पोलिसांना रोखण्यात आले

पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यानंतर राहुल गांधी साहिलच्या कुटुंबीयांसह बाहेर आले. त्यांनी सांगितले की केवळ तक्रार नोंदवण्यासाठी त्यांना आठ तास लागले. हे न्यायाच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. पोलिसांना एफआयआर नोंदवू नका, असे आदेश वरून आले होते, असा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला. 20 जुलै रोजी पेलेट गनचा वापर झाला. त्याचा पुरावा आहे. 200 छर्रे साहिलच्या शरीरात आहेत. 3 छर्रे त्याच्या डोळय़ात आहेत. एवढेच नव्हे तर त्याच्या हृदयाजवळ छर्रे आहेत आणि ते काढता येणार नाही.

अमित शहांवर राहुल गांधींचा हल्ला

राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर ठिय्या आंदोलनासंदर्भात पोस्ट टाकून अमित शहा यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. राहुल गांधी म्हणाले की, शांततेने आंदोलन करणाऱ्यांविरोधात झालेल्या निर्दयी लाठीहल्ला आणि पॅलेट गनने मारा करण्यात आला. त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. हा एक गंभीर गुन्हा आहे. यावर अमित शहा यांनी विद्यार्थ्यांना कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही, पंतप्रधानांनीदेखील विद्यार्थ्यांची माफी मागितली नाही. अमित शहा तुम्ही न्यायापासून एवढे का घाबरता? या भीतीतून दिसते की तुम्ही गुन्हा मान्य करत आहात. एफआयआर नोंदविण्यात येईल, तपास होईल आणि वरून खालपर्यंत जे कोणी या निर्दयीपणासाठी दोषी आहेत, त्याच्यावर कारवाई होईल. साहिल व त्याच्यासारख्या प्रत्येक पीडित विद्यार्थ्याला न्याय मिळवून देऊ, असे राहुल गांधी म्हणाले.

झुकती है दुनिया…

आंदोलक विद्यार्थ्यांवर पॅलेट गनने गोळय़ा झाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर काँग्रेसकडून ‘एक्स’ पोस्ट करण्यात आली. ‘राहुल गांधी यांनी साडेसात तास ठिय्या आंदोलन करून अमित शहा आणि त्यांच्या दिल्ली पोलिसांना गुडघ्यावर आणले. म्हणतात ते खरंच आहे… झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए’ असे या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.

शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पेलेट गनने गोळय़ा झाडण्यात आल्या. हा एक गंभीर गुन्हा आहे. यावर ना पंतप्रधानांनी माफी मागितली, ना अमित शहा यांनी स्पष्टीकरण दिले. अमित शहांचे पोलीस विद्यार्थ्यांची तक्रारही ऐकून घेत नाहीत. अमित शहा, तुम्ही इतके का घाबरताय? तुम्हाला गुन्हा कबूल असल्याचेच हे लक्षण आहे!