भयंकर… सोडून गेलेली पत्नी परत यावी म्हणून मित्राचा नरबळी दिला; घरी जेवायला बोलावलं अन् गाढ झोपेत असताना मुंडके छाटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकविसावे शतक सुरू होऊन जवळपास तीन दशक होत आली आहेत. हे शतक विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी ओळखले जात असले तरी अंधश्रद्धा आणि तंत्रमंत्राचा पगडा कमी झालेला नाही. याचाच प्रत्यय ओडिशातील बलांगिर जिल्ह्यात आला आहे. येथे एका व्यक्तीने 10 वर्षांपूर्वी सोडून गेलेली पत्नी परत यावी म्हणून मित्राचाच नगरबळी दिला. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. ‘डेक्कन क्रोनिकल‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

बलांगिर जिल्ह्यातील बाग्डा गावात ही घडली. आरोपी शत्रूघ्न साहू याने तेबाडमुंडा येथील संतोष खारसेल (वय – 40) या मतिमंद मित्राला जेवायला आपल्या घरी नेले होते. 18 ऑगस्टच्या रात्री संतोष गाढ झोपेत असताना आरोपीने धारदार शस्त्राने त्याचे मुंडके धडावेगळे केले. हत्येनंतर अघोरी पूजेचा भाग म्हणून त्याने संतोषचे कापलेले मुंडके स्वतःच्या घरातील पूजाघराच्या फरशीखाली खड्डा खोडून गाडले, तर धड जवळच्या तलावात फेकून दिले.

तलावात एक मुंडके नसलेले धड तरंगताना दिसल्याने गावकऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. स्थानिकांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयावरून आरोपी शत्रूघ्न साहू याच्या घरावर छापा टाकला. पोलिसांनी पाहणी करून पूजाघराच्या जमिनीखाली पुरलेले संतोषचे मुंडके बाहेर काढले.

10 वर्षांपासून सोडून गेली होती पत्नी

बलांगिरचे पोलीस अधीक्षक अभिलाष जी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा नेहमीचा खुनाचा प्रकार नसून अंधश्रद्धेतून दिलेला नरबळी आहे. आरोपीची पत्नी जवळपास 10 वर्षांपूर्वी त्याला सोडून निघून गेली होती. नरबळी दिल्यास ती परत येईल, असा ठाम गैरसमज आरोपीचा होता. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.