
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पुण्यात ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम उधळून लावण्याची भाषा भाजप आणि एबीव्हीपीकडून केली जात आहे. याचा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला. मोदी-शहा राहुल गांधी यांना घाबरलेले आहेत. त्यांच्या मनामध्ये भीती आहे. राहुल गांधी विद्यार्थ्यांशी बोलणार म्हणून त्यांचा कार्यक्रम उधळून लावण्याची भाषा कुणी करत असेल तो दहशतवाद आहे. अशा प्रकारची भूमिका घेणाऱ्यावर पुणे पोलीस आयुक्तांनी कठोर कारवाई केली पाहिजे, असे संजय राऊत पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हणाले.
राहुल गांधी पुण्यात येत आहेत. ते लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. एबीव्हीपी, मोदी-शहा हे मान्य नसले तरी भविष्यात संसदेत राहुल गांधी यांच्या समोर विरोधी पक्षातच या लोकांना बसावे लागणार आहे. त्यांनी ही मानसिक तयारी केली पाहिजे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. राहुल गांधी यांच्या कार्यक्रमासाठी पुण्याच्या पोलिसांनी 30 अटी टाकलेल्या आहेत. राहुल गांधी काय परदेशातून येत आहेत का? ते या देशाचे नागरीक नाहीत का? अमित शहा किंवा अन्य नेते येतात त्यांच्यासाठीही पोलीस आयुक्तांकडून अशा अटी टाकल्या जातात का? असा सवालही संजय राऊत यांनी केला.
देशातील भाजपची यंत्रणा आणि त्याच्या सत्तेच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. सप्टेंबर महिन्यानंतर या सरकारच्या, भाजपच्या पडझडीला सुरुवात होईल. हे घाबरलेले सरकार असून मोदी-शहांचे चेहरे बघा, कसे काळठिक्कर पडलेले आहेत. ते राहुल गांधी यांना घाबरलेले आहेत. काल राहुल गांधी यांनी संसद मार्ग पोलीस स्टेशनला ठिय्या मारला आणि पेलेट गन्स चालवणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करायला लावला. राहुल गांधींपुढे सरकार झुकले. पुण्यातील लोकांना वाटत असेल आपण फार मोठी मर्दुमकी, शौर्य गाजवत आहोत. पोलिसांच्या मदतीने गुंडगिरी करू इच्छिणाऱ्यांना लागलेली ही अखेरची घरघर आहे. भविष्यात ही गुंडगिरी मोडून काढली जाईल, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.
भाजप हा डरपोक लोकांचा पक्ष असून सत्तेची कवचकुंडले असल्यामुळे ही दादागिरी दिसते. ज्या दिवशी सत्ता जाईल त्या दिवशी 90 टक्के भाजप बिळात गेलेला असेल. वर्षभर ते घरातून बाहेर पडणार नाहीत, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. ते पुढे म्हणाले की, राहुल गांधी या देशाचे विरोधी पक्षनेते असून ते पुण्यातील विद्यार्थांशी, खास करून विद्यार्थिनींशी बोलत आहेत. नारी शक्ती वंदन बिलावर तुम्ही सातत्याने आम्हाला आव्हान देताय आणि राहुल गांधींच्या स्वागताला, त्यांच्याशी संवाद करायला नारी शक्ती जनते तर तुम्ही तो कार्यक्रम उधळून लावायच्या गोष्टी करताय. राहुल गांधी विद्यार्थ्यांशी बोलणार म्हणून त्यांचा कार्यक्रम उधळून लावण्याची भाषा कुणी करत असेल तो दहशतवाद आहे, असे संजय राऊत म्हणाले.
भाजप हा कायम घाबरलेला आणि भेदरलेला पक्ष आहे. यांनी कधीही देशाच्या स्वातंत्र्यासाठी, रक्षणासाठी शौर्य गाजवल्याची इतिहासात उदाहरणे नाही. ऑपरेशन सिंदूर केले त्यातही ते घाबरले आणि ट्रम्पने डोळे वटारल्यावर पळून गेले. ऑपरेशन सिंदूर थांबवले, त्या भाजपकडून काय अपेक्षा करता? हा त्यांच्या सत्तेतील शेवटचा काळ आहे. 2029 च्या आधी त्यांची पडझड होऊ शकते अशा प्रकारचे वातावरण देशात आणि जगात आहे, असेही संजय राऊत म्हणाले. तसेच वंदे मातरमचा आणि भाजपचा अजिबात संबंध नसून वंदे मातरम आणि काँग्रेसचा संबंध आहे. ज्यांचा स्वातंत्र्यलढ्याशी संबंध नाही, त्यांनी वंदे मातरमची उठाठेव करू नये या मताचा मी आहे, असेही ते म्हणाले.






























































