
‘न्यायाधीश म्हणजे कोणी देव नव्हेत. त्यांनी स्वतःच्या मर्यादा समजून घेतल्या पाहिजेत. त्यांचा प्रत्येक निर्णय योग्यच असेल असे नाही. तेही चुकू शकतात,’ असे परखड मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय करोल यांनी आज मांडले.
सेवाकाळाच्या शेवटच्या दिवशी झालेल्या निरोप समारंभात ते बोलत होते. ‘न्यायाधीशांनी केवळ कायद्याची योग्य अंमलबजावणी करावी एवढीच संविधानाची अपेक्षा नाही, तर ही अंमलबजावणी न्यायपूर्ण असावी. एखाद्या याचिकेत प्रकरणाची तथ्ये असू शकतात. मात्र त्यामागे जी व्यक्ती आहे, तिने नेमके काय गमावले आहे, त्याला कोर्टाकडून काय हवे आहे हे याचिकेतून कळेलच असे नाही. त्यामुळे न्यायाधीशांनी याचिकेमागील व्यक्तीलाही पाहिले पाहिजे. न्याय करण्यासाठी नम्रता असणे आवश्यक आहे, असे करोल म्हणाले.
कोर्टात मांडले जाणारे तर्क न्यायाधीशांनी ऐकलेच पाहिजेत, पण जे शब्दांत मांडलं जात नाही तेही ऐकलं पाहिजे. बऱ्याचदा निःशब्दता खूप काही सांगत असते. न्यायाधीशांनी ती समजून घ्यायला हवी.































































