
>> प्रसाद ताम्हनकर
[email protected]
अंतराळ मोहिमांमध्ये संगणकांची भूमिका दिवसेंदिवस महत्त्वाची होत आहे. यासाठी अमेरिकेची अंतराळ संस्था NASA अधिक शक्तिशाली आणि टिकाऊ संगणकीय यंत्रणा विकसित करत आहे. हाय परफॉर्मन्स स्पेसफ्लाइट कम्प्युटिंग (HPSC) या प्रकल्पातून विकसित होत असलेली नवी संगणक चिप याच दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.
अंतराळातील संगणकांसमोर पृथ्वीवरील संगणकांपेक्षा अनेक वेगळी आव्हाने असतात. त्यामुळे अंतराळात वापरल्या जाणाऱया संगणकांमध्ये केवळ वेगाला नव्हे, तर विश्वासार्हता आणि टिकाऊपणालाही मोठे महत्त्व असते. HPSC चिप या दोन्ही गरजा लक्षात घेऊन तयार केली जात आहे. NASA च्या जेट प्रॉपल्शन प्रयोगशाळेत या चिपच्या विविध चाचण्या सुरू आहेत. प्रकल्पाचे व्यवस्थापक जिम बटलर यांच्या नेतृत्वाखाली किरणोत्सर्ग, तापमान आणि धक्के यांचा सामना करण्याची तिची क्षमता तपासली जात आहे. या चिपचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, अंतराळयान अधिक स्वायत्त होण्याची शक्यता. पृथ्वीपासून लाखो किलोमीटर दूर असलेल्या यानाला प्रत्येक छोटय़ा निर्णयासाठी पृथ्वीवरील नियंत्रण केंद्राकडून आदेशाची वाट पाहणे शक्य नसते. यानाला स्वतभोवतीची परिस्थिती समजून घेऊन काही निर्णय तातडीने घ्यावे लागतात. नव्या चिपच्या मदतीने सेन्सरमधून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण, प्रतिमांची प्रक्रिया, वस्तू ओळखणे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कामे थेट अंतराळात करता येऊ शकतील.
याचा फायदा चंद्र आणि मंगळावरील भविष्यातील मोहिमांना मोठय़ा प्रमाणात होऊ शकतो. उदाहरणार्थ, एखादा रोव्हर मंगळाच्या पृष्ठभागावर फिरत असताना त्याच्या मार्गात अचानक अडथळा आला तर त्याची माहिती पृथ्वीवर पाठवून उत्तराची प्रतीक्षा करण्याऐवजी रोव्हरला स्वत निर्णय घेता येणे अधिक उपयुक्त ठरेल. त्याचप्रमाणे एखाद्या ग्रहावरून मिळणाऱया प्रचंड प्रमाणातील छायाचित्रे आणि वैज्ञानिक माहितीपैकी महत्त्वाचा भाग यान स्वत निवडू शकेल. विशेष म्हणजे, HPSC ही केवळ वेगवान चिप नाही. एका छोटय़ा चिपमध्ये संगणकासाठी आवश्यक असलेले अनेक घटक एकत्र आणण्यात आले आहेत. त्यामुळे कमी जागेत अधिक संगणकीय क्षमता मिळू शकते. अंतराळयानात जागा आणि ऊर्जा दोन्ही मौल्यवान असल्याने हा फायदा महत्त्वाचा आहे. चंद्रावर कायमस्वरूपी मानवी तळ उभारण्यापासून मंगळाच्या अधिक स्वायत्त मोहिमांपर्यंत पुढील अंतराळ संशोधनात संगणकीय क्षमता अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे अंतराळातील पुढची मोठी झेप कदाचित एखाद्या प्रचंड रॉकेटमध्ये नव्हे, तर हाताच्या तळव्यावर मावणाऱया या छोटय़ाशा चिपमध्ये दडलेली असू शकते. या तंत्रज्ञानामुळे भविष्यातील अंतराळ मोहिमांमध्ये पृथ्वीवरील नियंत्रण केंद्रांवरील अवलंबित्व कमी होईल. अंतराळयान अधिक वेगाने परिस्थिती समजून घेऊन निर्णय घेऊ शकेल आणि वैज्ञानिक संशोधनाची गतीही वाढेल.



























































