
ओडिशा किनारपट्टीजवळ बंगालच्या उपसागरात पनामाचा झेंडा असलेले ‘एमव्ही ओशन विनर’ हे मालवाहू जहाज शनिवारी बुडाले. जहाजावर एकूण २४ क्रू मेंबर्स होते. हिंदुस्था तटरक्षक दलाने आतापर्यंत दोघांना सुरक्षित बाहेर काढले आहे, तर उर्वरित २२ जणांचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जहाजावर २० चिनी नागरिक, ३ म्यानमारचे नागरिक आणि १ बांगलादेशी नागरिक असे एकूण २४ सदस्य होते. हे जहाज २० ऑगस्ट रोजी रात्री ओडिशातील पारादीप बंदरातून सिंगापूरच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र, पारादीप किनाऱ्यापासून सुमारे २४० नॉटिकल मैल (सागरी मैल) अंतरावर बंगालच्या उपसागरात या जहाजाचा संपर्क तुटला आणि काही वेळातच ते समुद्रात बुडाले.
जहाज बुडाल्याची माहिती मिळताच हिंदुस्थानी तटरक्षक दल आणि नौदलाने तातडीने संयुक्त शोध व बचाव मोहीम हाती घेतली आहे. या भागात असलेल्या इतर जहाजांनाही सतर्क करण्यात आले असून बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या शोधासाठी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जहाज नेमके कोणत्या तांत्रिक बिघाडामुळे किंवा प्रतिकूल परिस्थितीमुळे बुडाले, याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. बेपत्ता क्रू मेंबर्सचा युद्धपातळीवर शोध सुरू असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.





























































