
जपानला भूकंपाचा धक्का बसला आहे. रविवारी पहाटे जपानची राजधानी टोकियोसह पूर्वेकडील भाग 5.9 रिश्टर स्केल तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाने हादरला. यामुळे जपानमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून आतापर्यंत विविध प्रांतांमध्ये एकूण 23 जण जखमी झाले आहेत. काही भागात रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. सुवैदाने या भूकंपामुळे त्सुनामीचा कोणताही धोका निर्माण झालेला नाही, असे जपानच्या हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
जपानच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू टोकियोच्या उत्तरेकडील दक्षिण इबाराकी प्रांतात जमिनीखाली सुमारे 68 ते 70 किलोमीटर खोलीवर होता. अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हेनुसार भूकंपाची तीव्रता 5.8 नोंदवली गेली. टोकियोच्या मध्यवर्ती भागासह इबाराकी, चिबा आणि सायतामा प्रांतांत जपानच्या 7-पॉइंट तीव्रतेच्या स्केलनुसार लोअर 5 तीव्रतेचे धक्के जाणवले.
पहाटे 2 वाजता भूकंप झाल्याने अनेक नागरिक झोपेतून घाबरून उठले आणि सुरक्षेसाठी पळताना किंवा घरातील वस्तू अंगावर पडल्यामुळे जखमी झाले. सायतामा प्रांतात 9, कानागावा 9, चिबा 4 आणि इबाराकी प्रांतात 1 व्यक्ती जखमी झाली आहे. योकोहामा येथे 80 वर्षांच्या एका वृद्ध महिलेचा पलंगावरून खाली पडल्याने कमरेचे हाड फ्रॅक्चर झाले. तर टोकियोच्या पूर्व कोतो वॉर्डमध्ये भूगर्भातील पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटल्याने रस्त्यावर पाणी साचले होते.
वाहतुकीवर परिणाम
टोकियो आणि नारिता विमानतळाला जोडणाऱ्या केईसी लाईनसह अनेक स्थानिक आणि एक्सप्रेस गाड्यांना विलंब झाला. काही मार्गांवर गाड्या कमी वेगाने चालवण्यात आल्या. पूर्व जपान रेल्वे कंपनीने (JR East) दिलेल्या माहितीनुसार, शिंकानसेन (बुलेट ट्रेन) सेवा सुरळीत सुरू राहिली.
सतर्कतेचा इशारा
जपानच्या पंतप्रधान सानाए ताकाइची यांनी सोशल मीडियाद्वारे माहिती दिली की, प्रशासनाने नुकसानीचा तातडीने आढावा घेण्यासाठी विशेष टास्क फोर्सची स्थापना केली आहे. इबाराकी येथील तोकाई नंबर 2 आणि फुकुशिमा येथील अणू ऊर्जा प्रकल्पांमध्ये कोणतीही तांत्रिक अडचण किंवा नुकसान झाले नसल्याची पुष्टी करण्यात आली आहे. हवामान खात्याने पुढील 2 ते 3 दिवसांत आणि येत्या आठवड्यात पुन्हा ‘लोअर 5’ तीव्रतेचे धक्के बसण्याची शक्यता वर्तवली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.





























































