
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अत्याचारपीडित अल्पवयीन गतिमंद मुलीच्या कुटुंबाशी संवाद साधून त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. ‘काळजी करू नका, शिवसेना तुमच्या पाठीशी आहे’ असा धीरही यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला.
वसमत तालुक्यातील हट्टा येथील एका १३ वर्षांच्या अल्पवयीन गतिमंद मुलीवर बिस्किट आणि ५० रुपये देण्याचे आमिष दाखवून चार नराधमांनी अत्याचार केला. पोलिसांनी या चौघांच्याही मुसक्या आवळल्या असून न्यायालयाने चार दिवसांसाठी त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. पीडित मुलीवर सध्या नांदेड येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, सहसंपर्कप्रमुख सुनील काळे यांनी आज पीडित कुटुंबाची भेट घेतली. यावेळी संदेश देशमुख यांच्या मोबाईलवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्या कुटुंबाशी संवाद साधला.
‘शिवसेना आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी असून, काळजी करू नका. तुम्हाला सर्वतोपरी मदत केली जाईल’, असा शब्द यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. शिवसेना नेते आमदार अंबादास दानवे यांनी संवाद साधून कुटुंबीयांना धीर दिला. याप्रसंगी तुषार जाधव, शिवसेना पदाधिकारी तसेच शिवसैनिकांची उपस्थिती होती.




























































