
बनावट प्रमाणपत्रे आणि कागदपत्रांच्या आधारे तब्बल 2 हजार 143 कोटी 79 लाख 43 हजार 730 रुपयांची प्रचंड आर्थिक अफरातफर तसेच बेकायदेशीररीत्या परकीय चलनाची देवाणघेवाण करणारा एक महाघोटाळा लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात उघडकीस आला आहे. आयकर विभागाने सलग तीन दिवस चालवलेल्या धडक चौकशीनंतर शुक्रवारी रात्री उशिरा या प्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने लातूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील आयकर विभागाच्या विशेष पथकाने उदगीर शहरातील मोंढा भागात तीन दिवसांपासून डेरा टाकला होता. या काळात संशयास्पद बँक खाती, आर्थिक व्यवहार आणि कागदपत्रांची कसून पडताळणी करण्यात आली. या प्राथमिक तपासातच 2 हजार कोटींहून अधिक रकमेची हेराफेरी झाल्याचे उघड झाले. तपासातील हा प्रचंड आकडा पाहून आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारीही अवाक झाले. गैरव्यवहाराची खात्री पटल्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे उप-आयकर संचालक दीपक कुमार यांनी उदगीर शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
उदगीर येथील न्यू मोंढा रोड परिसरातील रहिवासी श्याम शिवप्रसाद कलाणी याने इतर 16 बोगस कंपन्यांच्या संचालकांशी संगनमत करून हा आर्थिक गैरव्यवहार रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. परदेशी निधी पाठवण्यासाठी लागणारी बनावट आणि खोटे प्रमाणपत्रे तयार करण्यात आली होती. बेकायदेशीर मार्गांचा अवलंब करत, केवळ स्वतःच्या आर्थिक लाभासाठी हा अफाट निधी थेट परदेशात वळवण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणी मुख्य संशयित श्याम कलाणी याच्यासह संबंधित 16 कंपन्यांच्या संचालकांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 318(4), 234, 229 आणि 3(5) अन्वये फसवणूक, बनावट कागदपत्रे बनवणे व आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या घोटाळ्याची व्याप्ती थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेली असल्याने आणि यात हजारो कोटी रुपयांचा समावेश असल्याने, लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी या प्रकरणाचा पुढील सखोल तपास लातूरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सुपूर्द केला आहे.




























































