
‘नीट’ पेपरफुटी प्रकरणातील साक्षीदार असल्याचे कारण देत री नीट-यूजी 2026 चा निकाल रोखून धरल्याप्रकरणी हायकोर्टात दाद मागणाऱया दोन विद्यार्थ्यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. री नीटचा निकाल जाहीर करा असे आदेश न्यायालयाने राष्ट्रीय परीक्षा संस्थेला (एनटीए) दिले असून या विद्यार्थ्यांना एमबीबीएस तसेच बीडीएस अभ्यासक्रमाच्या पेंद्रीय प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीत सहभागी करून घेण्याचे न्यायालयाने निकालात नमूद केले आहे.
कोणतेही कारण नसताना किंवा कोणतीही चूक नसताना ठाणे आणि पुणे येथील दोन विद्यार्थ्यांचा नीट परीक्षेचा निकाल एनटीएकडून रोखून धरण्यात आला. त्यामुळे या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता आले नाही तसेच 12 ऑगस्ट रोजी झालेल्या पहिल्या फेरीच्या प्रवेश प्रक्रियेची संधीही गमवावी लागली. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी अॅड. अभिजित देसाई यांच्या वतीने हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती रियाज छागला आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. विद्यार्थ्यांना बजावण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटिसा यापूर्वीच्या नीट परीक्षेशी संबंधित आहेत. तसेच री नीट परीक्षेच्या संदर्भात या विद्यार्थ्यांना आरोपी करण्यात आलेले नाही. त्यामुळे या दोन्ही विद्यार्थ्यांचे री नीटचे निकाल जाहीर करण्याचे व ऑफलाइन पद्धतीने नोंदणी करून त्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचे आदेश दिले.



























































