म्हाडाच्या कोकण मंडळ सोडतीमधील घरांची संख्या घटणार, आठ हजार घरांची लॉटरी हजार घरांवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai-mhada-lottery-delay-75000-applicants-waiting-for-2640-houses-draw-date

नगरविकास विभागाने 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील घरांचे वाटप यापुढे ‘म्हाडा’ऐवजी पालिकेच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सप्टेंबरमध्ये येणारी म्हाडाच्या कोकण मंडळाची लॉटरी अडचणीत आली असून लॉटरीतील घरांच्या संख्येत मोठी घट होणार आहे. कोकण मंडळातर्फे सात ते आठ हजार घरांची लॉटरी काढण्यात येणार होती. आता लॉटरीत केवळ एक हजार घरांचा समावेश असणार आहे.

सर्वसामान्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवाळीदरम्यान सात ते आठ हजार घरांची लॉटरी काढण्याचे म्हाडाच्या कोकण मंडळाचे नियोजन आहे. यात 20 टक्के योजनेतील जवळपास पाच हजार घरांचा समावेश करण्यात येणार होता. त्यानुसार कोकण मंडळाने संबंधित महापालिकांकडे आणि बिल्डरांकडे पत्रव्यवहार करून या योजनेतील घरे मिळविण्यासाठी पाठपुरावादेखील केला. मात्र, नुकतीच नगरविकास विभागाने 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील घरांबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार या योजनेतील घरांचे वाटप करण्याचे अधिकार यापुढे म्हाडाऐवजी संबंधित महापालिकांकडे देण्यात आले आहे. शासन निर्णय प्रसिद्ध झाल्याच्या दिवसापासून हा निर्णय लागू झाला आहे.

 कोकण मंडळाच्या आगामी लॉटरीत 12 ऑगस्टपूर्वी म्हाडाला उपलब्ध झालेल्या 20 टक्के योजनेतील 500 घरांचा तसेच यापूर्वीच्या लॉटरीतील शिल्लक राहिलेल्या चितळसर मानपाडा येथील जवळपास 500 घरांचा समावेश असणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.